“बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी इथे येऊन वेगळी विधाने करू नयेत” !! योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ नोव्हेंबर २४ शुक्रवार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा घेत आहेत.प्रचार सभेतून ते ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत असून मतदारांनी काय केले पाहीजे ? याचा सल्ला देत आहेत.भाजपानेही योगी आदित्यनाथांचा नारा उचलून धरला आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नाऱ्याला घेऊन एक्सवर पोस्ट टाकली आहे मात्र महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनी मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्यावर जोरदार टीका केली असून “बाहेरच्या राज्यातील नेते येऊन काहीही विधाने करत आहेत पण महाराष्ट्राने नेहमीच जातीय सलोखा जपलेला आहे.” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी करणे चुकीचे ठरेल.महाराष्ट्रातील लोकांनी आजवर पुरोगामीपण जपलेले आहे.बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी इथे येऊन वेगळी विधाने करू नयेत.महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना माननारा आहे.बाहेरच्या राज्यातील नेते जे विचार मांडत आहेत ते विचार महाराष्ट्राने कधीच मान्य केलेले नाहीत.” हे विधान करताना अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांचे नाव घेणे मात्र टाळले.दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगींच्या नाऱ्याला प्रसिद्धी दिली आहे.पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत यासाठी फडणवीस यांनी एक व्हिडीओ एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देताना दिसत आहेत.भाजपाचे दुसरे नेते मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्यात काहीच चुकीचे नसल्याचे सांगितले आहे.
अजित पवार यांनी अनेक मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.महायुतीमधून विरोध झाल्यानंतरही त्यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ केली.भाजपा आणि शिवसेनेने नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतरही अजित पवार हे नवाब मलिकांच्या प्रचारासाठी मानखूर्द-शिवाजी नगर येथे पोहोचले.मलिक यांना मनी लाँडरींग प्रकरणात ईडीने अटक केली होती.ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.मानखूर्द-शिवाजी नगर मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात उतरलेला आहे तरीही अजित पवार यांनी आपला उमेदवार इथे दिला.नवाब मलिकांवरील आरोपांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की,नवाब मलिकांवर झालेले कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत फक्त आरोप झाले म्हणून त्यांना दोषी मानता येणार नाही.मी त्यांच्यासाठी प्रचार करणार.पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात प्रचार करत आहेत.बारामतीमध्ये ते सभा घेणार का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की,मला बारामतीमध्ये कुणाचीही सभा नको आहे त्यामुळे त्यांची (पंतप्रधान मोदी) इतर मतदारसंघात अधिक गरज आहे.