“रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…” !!
अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०९ नोव्हेंबर २४ शनिवार
“मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते” अशी सुरेश भटांची एक कविता प्रसिध्द आहे.मात्र राज्यात आजही अशी गावे आहेत तिथे मरणानंतरही नागरीकांचे हाल संपत नाही.पेण तालुक्यातील खवसावाडी यापैकी एक… वाडीवर जायला रस्ता नसल्याने एका महिलेला मृत्यूनंतर तिचा मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ आली.खवसा वाडीवरील आंबी राघ्या कडू ही ४२ वर्षिय महिला या आजारी असल्याने त्यांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे त्यांचा मृतदेह पुन्हा वाडीवर आणण्यात आला.मात्र वाडीवर जायला रस्ता नसल्याने हा मृतदेह झोळी करून वाडीवर न्यावा लागला व त्यासाठी सहा ते सात किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली.
खवसा वाडीतील आदिवासी बांधव २०२२ वाडीवर रस्ते,वीज,पाणी यासारख्या पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत व यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत,शासनदरबारी निवेदनेही दिले आहेत.यानंतर १ जानेवारी २०२४ सिध्दिविनायक कन्स्ट्रक्शनला या रस्त्यासाठी ७ कोटी ६० लाख रुपयांच्या कामामाचा ठेका देण्यात आला मात्र दहा महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही त्यामुळे वाडीवरील रहिवाश्यांचे रस्त्या अभावी हाल सुरूच आहेत. विकासाच्या नावाखाली सध्या राजकीय पक्षांकडून निवडणुका लढविल्या जात आहेत तर दुसरीकडे आजही आदिवासी वाड्यांना रस्ते,वीज,पाणी शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे.खवसावाडीवरील या घटनेमुळे विकासाचे दाव्याचे भिषण वास्तव समोर आले आहे.गेली दोन वर्ष ग्रामसंवर्धन सस्थेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी वाड्यावरील पायाभूत सुविधांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करत आहोत मात्र प्रशासकीय यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.पेण,अलिबाग येथे याबाबत अनेक आंदोलनेही झाली आहेत मात्र प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ही कामे सुरू होई शकलेली नाहीत त्यामुळे लोकांचे हाल सुरूच आहेत असे ग्राम संवर्धन संस्था संघटक संतोष ठाकूर यांनी म्हटले आहे.