छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० नोव्हेंबर २४ रविवार
विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे.प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांने राजकारण तापले आहे.या पार्श्वभूमीवर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पार पडली व या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला असून “सुन लो ओवैसी,हे छत्रपती संभाजीनगर आहे,औरंगाबाद नाही” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमला दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत.सुन लो ओवैसी हे छत्रपती संभाजीनगर आहे.आता कुणाचा बापही आला तरी छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलू शकत नाही.काल एमआयएमची या ठिकाणी सभा झाली.त्या सभेमध्ये एक महिला म्हणाली की,छत्रपती संभाजीनगर नाव कसे झाले ? त्यांना हे माहिती नाही की,छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आणि महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज होते व ज्या छत्रपती संभाजी महाराजांना पडकण्यासाठी औरंगजेब संभाजीनगरमध्ये येऊन बसला.मात्र ९ वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झुलवत ठेवले.एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज हरले नाहीत मात्र फितुरी झाली नसती तर आमचे छत्रपती संभाजी महाराज कधीच औरंगजेबाच्या हातात आले नसते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.औरंगजेबाचे नाव या शहराला कधीच राहू नये म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारने या शहराला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिले आहे पण ज्यांचे मनसुबे रझाकारांचे राज्य आणण्याचे आहे त्यांना मी सांगतो की आम्ही जागे झालो आहोत.ही निवडणूक एकजूट दाखवण्याची आहे.आपण धर्मयुद्ध करू.देव,देश आणि धर्म काय आहे ? हे संभाजीनगरकरांनी दाखवून द्यायला हवे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.आता या ठिकाणी ‘व्होट जिहाद’ सुरु झालेला आहे.आपण सर्वांनी पाहिले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाच लोकसभा मतदारसंघात एक लाख ९० हजार मतांनी आपण पुढे होतो मात्र फक्त चार हजार मतांनी आपले उमेदवार पराभूत झाले.लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हे आपल्या अनेक मतदारसंघात पराभवाचे कारण राहिले.काही लोकांनी भगव्याबद्दल गद्दारी केली.काही लोकांनी मतांची लाचारी केली असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.