बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१० नोव्हेंबर २४ रविवार

विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत.या सभेच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी नेते जनतेला आवाहन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.याबरोबरच प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत.यातच काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली.परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.आता शरद पवारांनी काल परळीत झालेल्या सभेत बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात तीन नेत्यांचा प्रामुख्याने सहभाग होता असा आरोप परळीत बोलताना शरद पवारांनी केला.परिणामी राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात कोणत्या तीन नेत्यांचा प्रामुख्याने सहभाग होता ? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात असून शरद पवारांचा रोख नेमकी कुणाकडे आहे ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

काही लोकांनी पक्ष फोडायचे काम केले.पक्ष फोडणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीत तीन लोक प्रामुख्याने होते.ते सहकाऱ्यांमध्ये गैरविश्वास मांडू लागले.ते दोन-तीन लोक कोण आहेत ? हे सांगण्याची मी आवश्यकता नाही अशा व्यक्तींना उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी पराभूत करण्याचे काम तुम्हाला करायचे आहे व त्यांचा पराभव करा आणि राजेसाहेब देशमुख यांना निवडून द्या असे शरद पवार सभेत बोलताना म्हणाले.काही लोकांना राजकीय संकटात मदतीची आवश्यकता होती त्यावेळी माझ्याकडून त्यांना मदत केली गेली.मला आठवते की मुंबईला माझ्या घरी पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते तेव्हा पंडित अण्णांनी सांगितले की,आमच्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुमची मदत आम्हाला पाहिजे.त्यांना पक्षात घेतले.संघटनेची जबाबदारी दिली.विधानपरिषदेचे आमदार केले.विरोधी पक्षनेते केले.महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी केले,त्यांच्यासाठी जे-जे करता येईल ते केले व या लोकांना सत्ता दिली पण त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असे म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.तर कोणाचाही नाद करायचा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही.मंत्री महोदय (धनंजय मुंडे) तुम्ही आता शरद पवारांचा नाद केला आहे तर तुम्हाला आता हबाडा दिल्याशिवाय शरद पवार थांबणार नाहीत व परळीची जनताही थांबणार नाही असा इशारा राजेसाहेब देशमुख यांनी परळीतील सभेत बोलताना दिला.