Just another WordPress site

“मोदी केवळ मतांसाठीच दलित,आदिवासी हिताची भाषा बोलतात” !! काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.११ नोव्हेंबर २४ सोमवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अनुसूचित जाती-जमातीच्या नेत्यांना गौण स्थान असून राज्यमंत्री करून अनेकांची बोळवण केली आहे.एकाही दलित नेत्याला चांगले खाते,मंत्रिपद दिलेले नाही.मोदी केवळ मतांसाठीच दलित,आदिवासी हिताची भाषा बोलतात असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.महाविकास आघाडीचा जाहीरनामा ‘महाराष्ट्रनामा’ प्रकाशनाच्या कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगे बोलत होते.यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत,सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल,महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्या खासदार सुप्रिया सुळे,माजी खासदार वंदन चव्हाण,शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत,खासदार अरविंद सांवत आदी उपस्थित होते.

रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती करून दलितांची आणि आता द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केल्याचे सांगून आदिवासींची मते मिळविण्याचा प्रयत्न मोदींनी केला पण प्रत्यक्षात मोदींच्या मंत्रिमंडळात दलित,अदिवासी,मागासवर्गीयांना स्थान नाही.मोदींच्या मंत्रिमंडळात अनुसूचित जाती-जमातीच्या नेत्यांना अत्यंत गौण स्थान आहे.एकाही दलित नेत्याला चांगले खाते दिलेले नाही.मोदी फक्त दलित हिताच्या घोषणा करतात,प्रत्यक्षात दलितांना दुय्यम वागणूक देतात असा आरोप खरगे यांनी केला.महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक राहतात.संपूर्ण देश मुंबईकडे आर्थिक राजधानी,रोजगार देणारे शहर म्हणून पाहतो.देशभरातून लोक मुंबईत स्वप्न घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते,त्यांची स्वप्ने पूर्ण करते.सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो त्यामुळे ही निवडणूक फक्त महाराष्ट्राची नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी,तरुण,महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे.भाजप महायुतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणा असे आवाहनही खरगे यांनी केले.राहुल गांधी यांनी राज्यघटनेचे लाल रंगाचे पुस्तक दाखवले तर त्यांच्यावर शहरी नक्षलवादी म्हणून टीका केली जाते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे राज्यघटना भेट म्हणून दिले होते त्यावेळेचा फोटो दाखवून खरगे यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्या टिकेचा समाचार घेतला.आमचे सरकार लोकशाहीवादी विचाराचे आणि शिव,शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचाराचे असेल असा दावाही त्यांनी केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.