“माजी गृहमंत्र्यांवर हल्ले …… देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांच्या काळात झाले” !! अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी साधला निशाणा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ नोव्हेंबर २४ मंगळवार
माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली व त्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असतांना बेला फाट्यानजिक ही घटना घडली.दरम्यान या प्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.काटोल मतदार संघात अनिल देशमुख यांचे पूत्र सलील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.प्रचाराच्या अखरेच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदार संघात प्रचारात सक्रीय होते.संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती व ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत ते कारने काटोलकडे निघाले होते.या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले.
याप्रकरणी संजय राऊत म्हणाले,अनिल देशमुखांवर निर्घृण हल्ला झाला व त्यांच्या डोक्यावर दगडफेकीच्या जखमा झाल्या आहेत ते रक्तबंबाळ आणि अत्यवस्थ होते हा हल्ला करतांना भाजपाच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या.राज्यात बाबा सिद्दिकींची हत्या होते.गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो.या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले हे धिंडवडे आहेत.निवडणूक काळात राज्याच्या प्रशासनाची सुत्रे निवडणूक आयोगाकडे असतात.भाजपाच्या काळात त्यांचीच माणसे असतात,देवेंद्र फडणवीसांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे,उद्या मतदान होणार आहे,आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातील कितीतरी कार्यकर्त्यांना धमक्या येतील,त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रयत्न होतील व हे प्रकार राज्यभरात सुरू झाले आहेत असे म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.तसेच अनिल देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत आणि ते निवडून येत आहेत.अनिल देशमुख ७ वेळा निवडून आले आहेत.भाजपाची जे नौटंकी चालू आहे असे कधी झाले नव्हते. माजी गृहमंत्र्यांवर हल्ले व्हावेत असे कधीही महाराष्ट्रात झाले नव्हते ते देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांच्या काळात झाले आहे.काय यांच्या हातात कायदा सुव्यवस्था आहे ? असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.