नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पाडत असून सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील प्रत्येक केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मतदारांसाठी मराठीतून एक्स पोस्ट केली आहे.गेले महिनाभर कर्णकर्कश प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज बुधवारी होत असून त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असले तरी मुंबई,ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे.राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे.
“आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे.राज्यातील सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी.यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन मतदान करावे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
राज्यातील ९९० संवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.राज्यातील एक लाख ४२७ मतदान केंद्रांपैकी ६७,५५७ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे एक लाखाहून अधिक समजाकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी ८६ हजार ४६२ अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना गृह मतदानांची सुविधा देण्यात आली.दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीत मुंबईत मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला होता.मतदान केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.मतदानासाठी मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले होते यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती.या पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभेच्या तुलनेत सुमारे दोन हजार मतदान केंदांची संख्या वाढविण्यात आली आहे तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांना ताटकळत बसावे लागू नये म्हणून एका वेळी एकापेक्षा अधिक मतदारांना मतदान केंद्रात सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.