मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार

वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनेच्या (शिंदे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने एक बनावट पत्र वायरल केले असल्याचा आरोप मनसेकडून होत आहे व हे पत्र लोकांना दाखवले जात आहे.या पत्रावर राज ठाकरे यांची बनावट सही देखील असून त्यांनी वरळीत शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असल्याचा दावा या पत्राद्वारे केला जात आहे.याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेचे (शिंदे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुनावले आहे तसेच वरळीकरांना आवाहन केले आहे की शिवसेनेच्या (शिंदे) या खोट्या प्रचारावर विश्वास ठेवू नका.मनसेचे वरळीतील अधिकृत उमेदवार संदीप देशपांडे यांनी आपण याप्रकरणी निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचे जाहीर केले आहे.

संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांशी बातचीत केली यावेळी ते म्हणाले,“शिवसेनेचे (शिंदे) शाखाप्रमुख राजेश कुसळे हे वरळी मतदारसंघात खोटा प्रचार करत आहेत.मनसेने शिवसेनेचे (शिंदे) समर्थन केले असल्याची बतावणी केली जात आहे.शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांकडून वरळीत खोटा प्रचार चालू आहे व  या मतदारसंघात त्यांचा पराभव होणार असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.त्यांना माहिती आहे की ते पराभूत होणार आहेत म्हणूनच अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे.माझे वरळीकरांना आवाहन आहे की शिवसेनेच्या शिंदे या खोट्या प्रचाराला कोणीही बळी पडू नका.शिवसेनेच्या (शिंदेः शाखाप्रमुखाविरोधात व पदाधिकाऱ्यांविरोधात आम्ही पोलीस ठाण्यात तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहोत वरळीकरांनी या गोष्टीची नोंद घ्यावी.निवडणूक आयोग व पोलीस शिवसेनेवर (शिंदे) कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे.दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी दादरमधील बालमोहन विद्यामंदीर शाळेजवळील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी राज ठाकरे यांच्याशी बातचीत केली.यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी वरळीतील घटनेवर प्रतिक्रिया विचारली त्यावर राज ठाकरे म्हणाले,“मला सध्या तरी याबाबत काहीच माहिती नाही”.वरळीत यंदा तिरंगी लढत होत आहे.येथे शिवसेनेचे (ठाकरे) विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मिलिंद देवरा व मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी आव्हान दिले आहे.