छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून विधानसभेसाठी राज्यात आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे.आता या मतदानानंतर निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.आज राज्यभरात मतदान पार पडत असतांना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोप-प्रत्यारोपामुळे राजकारण तापले आहे.शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.यासंदर्भातील एक व्हिडीओ दानवे यांनी त्यांच्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे यामध्ये संजय शिरसाट हे एका पदाधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे.अंबादास दानवे यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत संजय शिरसाट हे एका पदाधिकाऱ्याला असे म्हणत आहेत की,“नीट करुन टाकेन,एका मिनिटात,मस्ती आली का तुला जास्त” असे म्हणत असल्याचे दिसत आहे.यानंतर अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
जशास तसे उत्तर द्यावे लागल ना ? मी ते उत्तर दिलेले आहे.मी एक तर कधी कुणाच्या नादी लागत नाही.नादी लागले तर त्याला सोडतही नाही.या प्रकाराची पोलीस तक्रार करण्याची आवश्यकता नाही.या छोट्या तक्रारी करण्यासाठी वेळ कुणाकडे आहे ? छोटा विषय लगेचच त्याच ठिकाणी दाबला पाहिजे.अन्यथा छोटा विषय मोठा होतो आणि त्यानंतर मतदानारांना त्रास होतो त्यामुळे काही वेळा अशा प्रकारची लोकशाही लोकांना आवडते.विरोधकांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळे ते गडबड करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे असे संजय शिरसाट यांनी ट्विव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलतांना म्हटले आहे.दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी काही पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स शेअर केला आहे तसेच संजय शिरसाट हे दमदाटी करत आहेत मात्र पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.