लग्नाच्या वरातीत नोटांचा पाऊस !! जेसीबी व छतावरून पडणारे लाखो रुपये जमा करण्यासाठी जमली तोबा गर्दी !!
उत्तरप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० नोव्हेंबर २४ बुधवार
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि आनंदाचा क्षण असतो व तो क्षण अविस्मरणीय करण्यासाठी वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय दोघेही प्रयत्न करतात.अनेकांमध्ये लग्न करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी आनंद सारखाच व्यक्त केला जातो.हळदीला भलेमोठे डीजे साउंड तर लग्नात नवरी नवऱ्याची जबरदस्त एन्ट्री,डान्स अशा अनेक भन्नाट गोष्टी केल्या जातात.अनेकदा नवरदेव किंवा नवरीच्या अंगावरून १०,२०,५०,१०० तर जास्तीत जास्त २०० च्या नोटा ओवाळून उडवल्या जातात किंवा बँडवाल्यांना दिल्या जातात.अनेक लग्नांमध्ये तुम्ही असे प्रकार हमखास पाहिले असतील पण लग्नाच्या वरातीवर चक्क ५०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पडल्याचे कधी पाहिले आहे का ? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच.यात लग्नाच्या वरातीत नवरा-नवरीवर घराच्या छतावरून आणि जेसीबीवरून पडणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडल्याचे चित्र दिसत आहे.लग्नघरातील व्यक्तींना इतका आनंद झाला आहे की ते लोक कुठे जेसीबीवर चढून तर काही घराच्या छतावरून अगदी कागदाचे तुकडे उडवावे तशा नोटा उडवताना दिसतायत.अशाप्रकारे वरातीवर खरोखर नोटांचा पाऊस पडत असल्याचे व्हिडीओत दिसतेय व हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमधील असल्याचे सांगितले जात आहे.
वरातीवर उडवले १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल
सिद्धार्थनगरच्या देवलवा गावात एका आलिशान लग्नाच्या वरातीचा हा व्हिडीओ आहे जो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल आहे.या लग्नात वरातीमध्ये सुमारे २० लाख रुपये वरातीवर उडवण्यात आले.लग्नघरातील लोक घराच्या छतांवर आणि जेसीबीवर चढून नोटांचे बंडलच्या बंडल चक्क हवेत उडवत होते.यात १००,२०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता.अगदी कागदाच्या तुकड्यांप्रमाणे उडणारे हे पैसे गोळा करण्यासाठी देखील लोकांनी तोबा गर्दी केली होती.काही जण हात उंचावून तर काही मिळेल त्या पद्धतीने या नोटा गोळा करत होते.तीन मजली घराच्या अंगणात वरात उभी आहे यावेळी वरात सोडून जेसीबीसमोर नाचणारे लोक नोटा पकडण्यासाठी धडपडत होते यावेळी कोणीतरी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि आता तो व्हायरल होत आहे.अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.एका युजरने लिहिले की,‘तो एवढा मोठा दानशूर आहे तर त्याने काही गरीब मुलींची लग्ने करून दिली पाहिजेत असा दिखावा करून काय मिळणार ? दुसऱ्याने लिहिले की,‘एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे आली कुठून याचा तपास व्हायला हवा.तिसऱ्याने लिहिले की,‘हे पैसे तो दानदेखील करू शकतो.’ शेवटी एका युजरने लिहिले की,‘अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी,एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा उडवणे चुकीचे आहे.’
दरम्यान याप्रकरणी सिद्धार्थनगर पोलिसांनी सांगितले की,संबंधित घटनेवर सिद्धार्थनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.