मतदानावरून अनेक ठिकाणी तक्रारी,गोंधळ,आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.गोंधळाने काही वेळ मतदानही थांबवण्यात आल्याचे प्रकार घडले.विशेषत: परळी मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या केंद्राध्यक्षांना एक-दोन कार्यकर्त्याने दमदाटीची भाषा वापरत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला व या संदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमावर वेगाने प्रसारित झाली होती.परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदूरमध्ये मतदान यंत्रच फोडण्यात आल्याचा प्रकार घडला.या माहितीला दुजोरा देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना तिडके यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे.यंत्र फोडण्याच्या घटना मुरंब्री व सोसेवाडी गावातही घडल्या असून तीन प्रकारांपैकी एका ठिकाणी यंत्र बदलण्यात आले तर उर्वरित दोन ठिकाणी विजेरी बदलून पुन्हा मतदान सुरू करण्यात आले.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील शिक्षक पैसे वाटण्यासाठी आल्याचे वाटल्याने गावकऱ्यांनी त्यांना धक्के देऊन बाहेर काढले.बीड जिल्ह्यात हाणामारी,मतदान केंद्र ताब्यात घेण्याच्या आरोपापासून ते सरकारी यंत्रणाच सत्ताधारी गटास मदत करत असल्याचे आरोप करण्यात आले.

राज्यात घडलेल्या ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे आहेत.

● परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये अॅड.माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली.जाधव यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.धर्मापुरीमध्येही केंद्रावर सीसीटीव्ही बंद ठेवण्यावरून वाद झाला.

● राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धर्मापुरी केंद्रावरील अधिकाऱ्याला धारेवर धरले.त्यांच्याशी झालेले आक्रमक संभाषण समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते.

● केज या राखीव विधानसभा मतदारसंघात विडा व एका ग्रामीण भागात मतदान केंद्रातील व्यवस्थेमध्ये मतदानादरम्यान गोंधळ आणि वादावादी झाली.आष्टी मतदारसंघातील बेदरवाडीत दोन गटांत मतदानावेळी वाद झाले.