मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ नोव्हेंबर २४ गुरुवार
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.दि.२३ नोव्हेंबरला हा निकाल लागणार आहे.दरम्यान एक्झिट पोल्स समोर आले आहेत.एक्झिट पोल्सच्या अंदाजांनुसार राज्यात महायुतीचे सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र तीन एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीचे सरकार येईल असेही म्हटले आहे.दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार येईल असे म्हटले आहे.महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल.मतदान झाल्यानंतर जे कौल समोर येत आहेत त्यानुसार काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वात येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मग त्याला ब्राह्माणांचा जिहाद म्हणायचे का?
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटतांना पकडले गेले.पाच वाजल्यानंतर त्यांना राहता येत नाही.ते म्हणतात मी चिठ्ठी वाटायला गेलो होतो ही बाब हास्यास्पद आहे.किती खोटे बोलणार ? देवेंद्र फडणवीस यांचे पीए असणारे वानखेडे हे आर्वीमधून उभे आहेत.त्यांच्या मतदारसंघात दारुबंदी असतानाही गोडाऊनमध्ये दारु सापडली.वर्धा दारुबंदीचा जिल्हा आहे.दारु आणि पैसा यांचे वाटप करुन हे नोट जिहाद करु इच्छितात का ? भाजपाकडून व्होट जिहादचा नारा दिला जातो.खरेतर मतदान करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जाहीर केले की भाजपाला मतदान करणार त्याला काय ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचे का ? काय चालले आहे हे महाराष्ट्रात ? ज्यांना मतदान करायचे आहे त्यांचा तो अधिकार आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
भाजपाचा नोट जिहाद आहे का?
भाजपाने जे काही चालवले आहे ते नोट जिहाद आहे की दारु जिहाद आहे असाही सवाल नाना पटोलेंनी विचारला आहे.एवढेच नाही तर महाविकास आघाडीचे सरकार येईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.विनोद तावडे हे कथितरित्या पैसे वाटप करत असल्याचा आरोप बविआचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला होता तसेच विरोधकांनीही याबाबत भाजपावर बरीच टीका केली होती.मतदान पार पडण्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडली होती.या घटनेचा संदर्भ देत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे.