महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार?

भाजपाला १३२ जागा मिळाल्या आहेत त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हायला हवेत अशी मागणी भाजपातून होते आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिल्याची चर्चा आहे तसेच अजित पवार यांच्या पक्षानेही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास आमची काही हरकत नाही असे म्हटले आहे मात्र एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून अशी काहीही घोषणा करण्यात आलेली नाही.उलट एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केले जावे अशी मागणी होते आहे.शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे.एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतील असा आम्हाला (शिवसेना) विश्वास आहे.एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली जाईल अशी आम्हाला खात्री आहे कारण आत्ता जे प्रचंड यश मिळाले आहे ते यश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवलेल्या निवडणुकांमध्ये मिळाले आहे.मी माझ्या पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे.कार्यकर्ता म्हणून माझी ही भावना आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असे नरेश म्हस्केंनी  म्हटले आहे.

बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबण्याची मागणी

नरेश म्हस्के पुढे म्हणाले,बिहारमध्ये ज्या प्रमाणे नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली गेली.महाराष्ट्रतही बिहार पॅटर्न राबवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले जाईल असा आम्हाला विश्वास आहे.हरियाणातही सैनी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले.ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाते त्यांनाच मुख्यमंत्री केले जाते हा पॅटर्न एनडीएने राबवला आहे त्यामुळे महाराष्ट्रातही तसेच होईल असे आम्हाला वाटते.शेवटी महायुतीचे सगळे नेते योग्य तो निर्णय करतील.मात्र जे.पी.नड्डा,अमित शाह,नरेंद्र मोदी हे एकनाथ शिंदेंचे नाव जाहीर करतील असेही नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.