मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार
एकनाथ शिंदे यांनी आज (२६ नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे व त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झाले आहे.राजभवनावर जाऊन शिंदे यांनी राज्यपालाकांडे राजीनामा सुपूर्द केला आहे त्यामुळे १४ वी विधानसभा विसर्जित झाली आहे तसेच एकनाथ शिंदे पुढील काही दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील.शिंदे यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.राजीनामा दिल्यानंतर हे नेते राजभवानाबाहेर पडल्यानंतर केसरकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी केसरकर म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणे म्हणजे औपचारिकता आहे.शिंदे यांनी आज त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
दरम्यान यावेळी केसरकरांना विचारण्यात आले की नवे सरकार कधी स्थापन होईल ? यावर ते म्हणाले,येत्या काही दिवसांत नवे सरकार स्थापन होईल.उद्या भाजपा आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे व त्या बैठकीत भाजपाच्या गटनेत्याची निवड होईल त्यानंतर तिन्ही पक्षांचे नेते (शिंदे,फडणवीस,पवार) एकत्र बसून चर्चा करतील आणि पक्षश्रेष्ठींकडे (भाजपा) जातील.भाजपा पक्षाश्रेष्ठींच्या सूचनेनुसार सरकार स्थापन होईल.आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याची असते मात्र तिन्ही पक्षांनी सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.केसरकर म्हणाले,मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे ही कायदेशीर तरतूद असते त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे आणि आता ते काळजीवाहू मुख्यमत्री झाले आहेत.दिल्लीतले निरीक्षक म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येतील,राज्यातील आमच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय वरिष्ठांवर (मोदी-शाह) सोपवला आहे. यावर सर्वांचे एकमत आहे.वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे.त्यावर दीपक केसरकर म्हणाले,वरिष्ठ नेते घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी व शाह घेतील तो निर्णय सर्वांनाच मान्य असेल.