मनसे उमेदवाराला फक्त दोनच मते ?

आव्हाड यांनी दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार राजेश येरूणकर यांचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.येरूणकर यांच्या घरात चार मतदार असतांना अवघी दोन मते पडली आहेत.आव्हाड म्हणाले की,“राजेश येरूणकर सांगत आहेत की,मी उमेदवार असलेल्या भागात मनसेला फक्त २ मते मिळाली.माझ्या आई,पत्नी,मुलीने सुद्धा मला मतदान केले नाही हे शक्य नाही.ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के भरलेली होती.फॉर्म क्र.१७सी आणि ईव्हीएम अनुक्रमांक जुळत नाहीत ही लोकशाहीची हत्या आहे”.

मतदान झाले ३१२, मतमोजणीत निघाले ६२४

मुंब्रा-कळवा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी देत निवडणुक प्रक्रियेवर शंका व्यक्त केली होती.या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावात एकूण मतदार ३९६ आहेत आणि गावात ३१२ जणांनी मतदान केले होते मात्र उमेदवारांना पडलेली मते दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

“३१२ जणांनी मतदान केले असतांना शिवसेना (UBT)-१९४,शिवसेना (शिंदे)-३२६,अपक्ष (हर्षवर्धन जाधव)-१०४ असे मतदान झाले आहे व या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ६२४ इतकी होते.EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? लवकरच हे उघडकीस आणू !” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केली आहे.

याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजेत्या उमेदवारांची एक यादी देखील शेअर केली आहे.‘ईव्हीएमचा सेट पॅटर्न’ असे कॅप्शन देत सादर केलेल्या यादीत महायुतीच्या विजेत्या उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते देण्यात आली आहेत यामध्ये उमेदवारांना जवळपास एकसारखीच मते मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित पवारांनीही उपस्थित केले प्रश्न

आव्हाड यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ईव्हीएमवर शंका घेतली आहे.“गुजराती ईव्हीएमच्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का ?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी ? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो.निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरे व काय खोटे हे सांगायला तयार नाही.आयोग नेमके काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे ? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.