“महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत एकनाथ शिंदे हा अडसर नाही !! मोदींचा निर्णय आम्हाला मान्य” !! एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचे स्वागत केले.निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात.तुमच्या माध्यमांतून सगळ्या मतदारांचे आभार मानतो.हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे.गेल्या अनेक वर्षांत असा निकाल जनतेने दिलेले नाही.मागच्या अडीच वर्षात महायुतीने उत्तम काम केले आहे.एकीकडे विकासकामी केली व महाविकास आघाडीने थांबवलेली कामी आम्ही पुढे नेली असेही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या.विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असेही एकनाथ शिंदे म्हणाले.महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले आहे.मी कार्यकर्त्यांचेही आभार मानतो असेही एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सांगितले.एकनाथ शिंदे म्हणाले मी जवळपास ८० ते ९० सभा घेतल्या तसेच एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केले.प्रवास तर पायाला भिंगरी लावून काम केले.सीएम म्हणजे कॉमन मॅन ही माझी धारणा आहे त्यामुळे लोकांशी संवाद साधताना कुठलाही अडथळा येत नव्हता.महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही ना काही केले पाहिजे असे मला कायमच वाटत होते.मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे त्यामुळे मी सामान्यांच्या वेदना,काटकसर,तडजोडी सगळे पाहिले आहे असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला.समाजातल्या सगळ्या घटकांसाठी आपण काही ना काही केले पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मी लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलेही मोजमाप व्हावे म्हणून मी काम केले नाही तर सरकार म्हणून काय देऊ शकतो ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला.केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभे राहिले हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो.दोन ते अडीच वर्षांत लाखो कोटींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला त्यामुळे मी एवढेच सांगेन की कुठे घोडे अडले आहे ? मी मनमोकळेपणाने सांगतो आहे मी काहीही ताणून धरलेले नाही.मी मोदींना फोन करुन सांगितले की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका.तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे.एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितले.त्यांना मी सांगितले की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केले,जे निर्णय घेतले त्यामुळे झाले आहे.लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण ते ओळखले.मी समाधानी आहे.लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे.मी नाराज वगैरे मुळीच नाही,रडणारे नाही तर लढणारे आहोत,लढून काम करणारे लोक आहोत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.आम्ही लोकांमध्ये गेलो,घरी बसलो नाही.आम्ही जे काम केले ते मनापासून केले.माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहिन असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे घेऊन गेलो.आनंद दिघे यांचे विचार घेऊन गेलो.आम्ही पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभे आहोत असे आम्हाला अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रिपद दिले.मी त्या प्रत्येक दिवसाचा,क्षणाचा वापर राज्याच्या हितासाठी केला.मी मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो कारण त्यांचे पाठबळ लाभले.या सगळ्या अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढला.मी अडीच वर्षांच्या माझ्या कालावधीत समाधानी आहेत. आमच्या सरकारमध्ये जे निर्णय झाले ते आजवर आम्ही जे निर्णय घेतले ते रेकॉर्डब्रेक आहेत.पत्रकार असोत,शेतकरी असो,लाडक्या बहिणी असोत सगळ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले.आमच्या काळात १२४ सिंचन प्रकल्प तयार झाले आहेत.या राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.