मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार
महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल.सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत तसेच लवकरच सरकार स्थापन होईल असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला अपयश आल्यामुळे आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून मंथन बैठका घेण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवरच शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी आमदारांची आणि पराभूत झालेल्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे.या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी काही वेगवेगळ्या भूमिका मांडल्या.यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बैठकीत काय चर्चा झाली ? यासंदर्भातील माहिती सांगत काही सूचक भाष्य केले.बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुका आपण स्वतंत्र लढले पाहिजे असे मत मांडले असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.निवडणुका आघाडीत न लढता स्वबळावर लढल्या पाहिजे अशा प्रकारचा सूर काही पदाधिकाऱ्यांचा होता असे अंबादास दानवे यांनी सांगितले ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.त्यामुळे विधानसभेत आलेल्या अपयशानंतर यापुढे ठाकरे गट आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
बैठकीत काही चर्चा झालेली नाही.विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.भलेही आमचे आमदार कमी निवडून आलेले असतील. शिवसेना एका आमदारावर देखील लढलेली आहे.वामनराव महाडीक किंवा छगन भुजबळ असतील हे एकटे लढले होते.शिवसैनिक कसा असतो याचे महाराष्ट्राला दर्शन झालेले आहे.आता तर आम्ही २० आहोत.आमची संख्या कमी झाली असली तरी आम्ही २० आहोत.या २० आमदारांनी देखील महाराष्ट्राच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी लढावे आणि काम करावे अशा प्रकारचा निर्धार पक्षप्रमुखांच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे असे अंबादास दानवे यांनी सांगितले.विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काही भूमिका येत असतात.बैठकीत ईव्हीएमबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.ईव्हीएमविषयी आम्ही न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार आहोत. संघटनेविषयी काहींनी मत मांडले की आपण यापुढे स्वतंत्र लढले पाहिजे.कोणी म्हणते की एकत्र लढले पाहिजे.अशा वेगवेगळ्या भूमिका सर्वांनी मांडलेल्या आहेत. सर्वांची मते उद्धव ठाकरे यांनी देखील ऐकून घेतले आहेत असे अंबादास दानवे यांनी सांगितले.