मागच्या दोन वर्षांत भाजपाने इतर राज्यांमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला करून नवे नेतृत्व दिले आहे.मध्य प्रदेशमध्ये त्यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या जागी डॉ.मोहन यादव,छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांच्याऐवजी विष्णू देव साय,राजस्थानमध्ये वसुधंरा राजे यांच्याऐवजी भजनलाल शर्मा आणि हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांना बाजूला सारून नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले.भाजपाने इतर राज्यात ज्याप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करून नवे नेतृत्व समोर आणले तसाच प्रयोग महाराष्ट्रात होणार का ? हे येणाऱ्या दिवसांत समजू शकेल.दरम्यान अमित शाह हे आता मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करत असले तरी त्यांनीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांचा विजय करा असे उद्गार शिराळा येथील सभेत काढले होते.या विधानामुळे महायुतीत काही वेळ चलबिचल पाहायला मिळाली होती. अमित शाह यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले असे त्यावेळी म्हटले गेले.त्यानंतर भाजपाने लगेच त्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली.