मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले त्यामुळे राज्यात महायुतीच सरकार लवकरच स्थापन होईल मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे अपयश आले असून महाविकास आघाडीच्या पराभवानंतर आता ठाकरे गट,काँग्रेसच्या विचारमंथनाच्या महत्वाच्या बैठका पार पडत आहेत तसेच विधानसभेच्या निकालाबाबत ईव्हीएमसंदर्भात महाविकास आघाडीकडून संशय व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीत नेमकी काय निर्णय घेण्यात आला ? याविषयी माहिती सांगितली आहे तसेच आता आम्ही बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी करत पंतप्रधान, राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना कोट्यवधी लोकांच्या सह्या पाठवणार असून यासंदर्भातील मोठी मोहीम राज्यात राबवणार आहोत अशी माहिती नाना पटोले यांनी सांगितली आहे.विधानसभेच्या निकालाला आता चार दिवस झाले आहेत मात्र अद्याप सरकार स्थापन झाले नाही.कोणाला मुख्यमंत्री करायचे हा ‘मित्राचा’ निर्णय होत नाही तोपर्यंत हे सरकार स्थापन होणार नाही तसेच मित्राला महाराष्ट्र कसा विकता येईल ? इकडे शेतकरी रोज आत्महत्या करतोय.शेतकरी आस लावून बसला आहे की सरकार आम्हाला काही मदत करेल पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही.भाजपाचे केंद्रातील जे नेते आहेत त्यांचे महाराष्ट्र विकण्याचे धोरण दिसत आहे. मित्राच्या आदेशाशिवाय मुख्यमंत्री कोणाला करायचे ? अशा प्रकारचे वातावरण राज्यात पाहायला मिळत आहे याचा आम्ही निषेध करत आहोत असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राज्यातील जनता एक प्रश्न विचारत आहे की आम्ही त्यांना मतदान दिले नाही तरीही हे सरकार निवडून कसे आले ? मी ही भूमिका आमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याकडे मांडली त्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की,ईव्हीएम मशीनची चर्चा करायची नाही.आता थेट बॅलेटवर निवडणुका व्हाव्यात अशी भूमिका आम्ही घेतली याचे आम्ही एक मोठे जनआंदोलन राहुल गांधींच्या नेतृत्वात उभारणार आहोत.‘भारत जोडो यात्रे’सारखे मोठे जन आंदोलन देशात केले जाईल असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रातील लोकांमध्येही मोठा उद्रेक आहे.आमचे मत देखील वाया चालले आहे.आम्ही ज्याला मत देतो ते मत दुसऱ्याला चाललय अशी भावना लोकांची आहे.आता आम्ही असा निर्णय केला आहे की दोन दिवसांनंतर राज्यात लोकांच्या सह्या घेण्याची मोहीम आम्ही घेत आहोत तसेच बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी,भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना कोट्यवधी लोकांच्या सह्या पाठवणार आहोत अशा प्रकारची मोठी मोहीम राज्यात आम्ही राबवणार आहोत व ही मोहीम लोकशाही वाचवण्याची मोहीम आहे असे नाना पटोले यांनी नमूद केले आहे.