मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार
विधानसभा निवडणुकीत ९५ जागा लढवून केवळ २० ठिकाणी विजय झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा त्यांचा आग्रह आहे.ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचा सूर असल्याचे सांगितले यावर आता संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका व्यक्त केली आहे.पराभव होताच मविआमधून बाहेर पडण्याचा काही जणांनी सूर आळवला असला तरी ही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे.पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असे संजय राऊत म्हणाले.संजय राऊत म्हणाले,शिवसेना (ठाकरे) महाविकास आघाडीपासून वेगळी होणार नाही.निकाल लागल्यानंतर तीनही पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.तीनही पक्ष आपापल्यापरिने निकालाचे विश्लेषण,चिंतन करत आहेत.या पराभवाची कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.ही कारणे ईव्हीएमच्या दिशेने जात असून तीनही पक्षांना एकत्र बसून चर्चा करावी लागेल.पराभव झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांची निश्चित अशी भावना असते की आपण स्वबळावर लढायला हवे होते पण आगामी काळात मुंबई मनपा आणि राज्यातील १४ महापालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे.
या विषयावर अधिक माहिती देताना संजय राऊत म्हणाले,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला आणखी पाच वर्षांचा काळ उरला आहे.आम्ही लोकसभेला मविआमधून निवडणूक लढलो त्याचा आम्हाला फायदा झाला हे विसरता येणार नाही पण दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीत यश मिळू शकले नाही त्याची कारणे काय आहेत हे आम्ही येणाऱ्या काळात शोधू.शांतपणे भविष्याचा विचार केल्यास तीनही पक्ष एकत्र बसूनच निर्णय घेतील,महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आता तरी कोणताही विचार नाही.
एकनाथ शिंदेंनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊ नये
मुख्यमंत्री कोण असेल ? हा निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींकडे दिल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावर टीका केली ते म्हणाले,एकनाथ शिंदे स्वतःला शिवसेना मानत आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीतील मोदी-शाहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊ नये.शिवसेनेचे निर्णय घेण्याचे अधिकार तुम्ही मोदी-शाहांना देत असाल तर स्वाभिमान वैगरे शब्द वापरण्याचा तुम्हाला अधिकार नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.