पराभूत उमेदवारांबरोबर राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीत ईव्हीएमवर व्यक्त करण्यात आला संशय !! राज ठाकरे यांच्या ईव्हीएम भूमिकेकडे लक्ष !!
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार
राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळाल्याने इतर सर्वच लहान-मोठे पक्ष नाराज झाले आहेत.भाजपा आणि महायुतीने सर्वच लहान पक्षांचा सुपडा साफ केला आहे. २०१९ मध्ये एक जागा मिळवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदा तीही जागा मिळवता आली नाही.मनसेने यंदाच्या निवडणुकीत खातेही उघडले नाही त्यामुळे नेमके काय झाले ? उमेदवारांचे नेमके म्हणणे काय आहे ? हे जाणून घेण्याकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्व पराभूत उमेदवारांची पुण्यात बैठक घेतली ही बैठक संपली असून पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठकीत काय घडले याबाबत माहिती दिली आहे.हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनी झी २४ तास शी संवाद साधतांना या बैठकीबाबत माहिती दिली.राज ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याविषयी साईनाथ बाबर म्हणाले, “गेल्या पाच वर्षांत महायुती आणि महाविकास आघाडीचे तोडाफोडीचे राजकारण,जाती पातीचे राजकारण झालेले असतांना मनसेला कमी मते मिळाली याविषयी आपआपल्या मतदारसंघातील परिस्थिती उमेदवारांनी राज ठाकरेंना समजून सांगितली.हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार कधी लोकांमध्ये गेले नाहीत,विकासकामे केली नाहीत.आम्ही लोकांमध्ये गेलो तेव्हा लोक आम्हाला म्हणाले की आम्हाला बदल हवाय,विकास हवाय पण ज्या पद्धतीने निकाल लागलाय त्यामुळे आमच्या मनात ईव्हीएमबद्दल शंका निर्माण झाली व ही शंका आम्ही राज ठाकरेंसमोर मांडली.या सर्वांबाबत त्यांची भूमिका राज ठाकरे येत्या काळात मांडतील.
साहेब प्रतिक्रिया देण्याकरता किंवा भावना मांडण्याकरता आले नव्हते.मुख्य पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेण्याकरता ते आले होते. निवडणुकीपूर्वी जे म्हणत होते की अजित पवारांचा सुपडा साफ होईल,त्या अजित पवारांना सर्वाधिक मते मिळालीत हे अविश्वसनीय आहे यावर चिकित्सा झाली पाहिजे. ईव्हीएम म्हणजे तंत्रज्ञान आहे.काहीही होऊ शकते.तंत्रज्ञान बनवणारा,चालवणारा आणि बिघडवणाराही माणूसच असतो त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा यावर विचार करण्याची वेळ आहे असा संशयही त्यांनी व्यक्त केला.आम्ही राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन १८ वर्षांपूर्वी मनसेत आलो.आजही आमचा विश्वास आहे की आमचा नेता यातूनही आम्हाला बाहेर काढेल.आजची परिस्थिती पाहता राज ठाकरेंविषयी एकही जण वाईट बोलत नाहीय.आम्हा प्रत्येकाला ईव्हीएमवर संशय आहे. निश्चित यामध्ये घोटाळा आहे.मी आयटीमध्ये काम करणारा माणूस आहे त्यामुळे मला माहितेय की निश्चित घोटाळा झाला आहे अशा पद्धतीने अद्भूत यश मिळणे अपेक्षित नव्हते.पोस्टल वोटमध्ये बरोबरीमध्ये चालले होते मग आता अद्भूत यश मिळणे अनपेक्षित आहे अशा संतप्त भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.