मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला व त्यानंतर पक्षाच्या बैठकीत त्यांनी सत्ताधारी किंवा विरोधक यांच्यापैकी कुणाशी युती-आघाडी करावी याबद्दल चर्चा केली.यावर भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू सारखे लोक महायुतीत नकोत अशी भूमिका घेतली तसेच बेताल विधान करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने आता दूर ठेवावे असेही ते म्हणाले.

बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिले व त्यांचे दिव्यांगाचे धोरण मान्य केले तरीही सरकारशी प्रतारणा करून त्यांनी विश्वासघात केला त्यामुळे त्यांना पुन्हा महायुतीत सामील करण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.साहजिकच हा निर्णय वरीष्ठ नेते घेतील पण बच्चू कडू यांच्यासारख्या बेताल बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा घेतले जाईल याची शक्यता कमीच वाटते.सरकारचे पाठबळ घेऊन सरकारचाच विश्वासघात करणारे बच्चू कडू असतील किंवा अन्य कुणीही असेल त्यांना पुन्हा महायुतीत घेऊ नये अशी आमची मागणी आहे असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान “गरज सरो वैद्य मरो,असा अजेंडा भारतीय जनता पक्षाने वापरू नये जर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता तसेच आजचे चित्र वेगळे राहिले असते त्यामुळे ही जी किमया आहे ती किमया एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे झाली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष असे करेल असे वाटत नाही.एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदासंदर्भातील दावेदारी योग्य आहे” असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.