नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला त्यावर आता महायुतीमधील पक्ष सोडले तर इतर विरोधक टीका करत आहेत.मविआचे घटक पक्ष,मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व अपक्षांनीही निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत विशेष करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले होते मग रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२ टक्के मतदान कसे झाले ? असा प्रश्न विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहेत यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.एस.चोक्कलिंगम म्हणाले की,सायंकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणे हे सामान्य आहे.निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळे मतदानाचा टक्का वाढतो.शेवटच्या तासात जवळपास ७.८ टक्के मतदान वाढले आहे यावर बोलतांना चोक्कलिंगम यांनी सांगितले की,सायंकाळी सहा वाजण्याची आधी जो मतदार रांगेत येऊन उभा राहतो त्याचे मतदान संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच राहते व ही रांग संपण्यासाठी कधी कधी सहा वाजण्याची मर्यादाही पुढे जाते.२०१९ साली सायंकाळी ५ वाजता जवळपास ५४.४ टक्के मतदान झाले होते त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी ६१.१ टक्के झाली होती.

एस.चोक्कलिंगम यांनी एक्स या सोशल नेटवर्गिंक साईटवर सविस्तर माहिती दिली आहे.महाराष्ट्रातील शहरी आणि निमशहरी भागात शेवटच्या तासांत अनेक मतदार बाहेर पडून मतदान करत होते असेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की,सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती ही टेलिफोनवरून तोंडी दिली जाते. मतदान संपल्यानंतर मात्र मतदानकेंद्रावरील अधिकारी फॉर्म १७-सी भरून देतात ज्यामध्ये अंतिम आकडेवारी नमूद केलेली असते.झारखंडमध्ये कमी मतदान झाल्याबद्दलही चोक्कलिंगम यांनी माहिती दिली ते म्हणाले,झारखंडमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालते तर महाराष्ट्रात सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असते.झारखंडमध्ये बहुतेक ग्रामीण भाग असल्यामुळे तिथे सकाळीच मतदान करण्यावर भर दिला जातो मात्र महाराष्ट्रात सायंकाळी पाच नंतरही अनेक मतदार बाहेर पडून मतदान करतात तसेच झारखंडमध्ये केवळ ३० हजार मतदान केंद्रे होती तर महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली होती असेही ते म्हणाले.