मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ नोव्हेंबर २४ शुक्रवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहेत व या निवडणुकीत भाजपा,शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांना बहुमत मिळाले असून लवकरच राज्यात महायुतेचे सरकार स्थापन केले जाईल.यादरम्यान महाविकास आघाडीकडून मात्र या निकालांवर संशय घेतला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार),शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत.आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून यासंबंधी आकडेवारी सातत्याने सोशल मिडियावर पोस्ट केली जात आहे.यादरम्यान आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न मांडले आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी निवडणूक मतदान आणि जाहीर झालेली आकडेवारी तसेच निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.नाना पटोले म्हणाले की,“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे.झालेले मतदान,जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत असून पारदर्शक निवडणुकीचा घोषा लावणाऱ्या निवडणूक आयोगाकडूनच नियमांना हरताळ फासण्यात आल्याच्या शंका प्रसारमाध्यमे,विविध सामाजिक संस्था आणि संशोधन करणाऱ्या व्यक्तींकडून उपस्थित केल्या जात आहेत”.निवडणूक आयोगाच्या संशयास्पद प्रक्रियेबद्दल आमचे काही प्रश्न आहेत असे सांगत नाना पटोले यांनी १० प्रश्न उपस्थित केले आहेत.
नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला विचारले १० प्रश्न
१) मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग दर दोन तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा रिपोर्ट अर्धा तास उशीराने का येत होता?
२) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८.२२% मतदान आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२% मतदान कसे झाले?
3) प्रत्येक व्यक्तीला मतदानासाठी साधारण एक मिनिटाचा कालावधी लागतो. याप्रमाणे मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळ यांची सांगड का बसत नाही?
४) रात्री उशीरापर्यंत झालेल्या मतदानाच्या रागांची छायाचित्रे आणि व्हिडिओ फूटेजेस निवडणूक आयोगाने का प्रसिद्ध केली नाहीत?
५) राज्यातील कोण कोणत्या मतदान केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू होते?
६) मतदानाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी ६६.५% मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर करण्यात आली?
७) रात्री उशीरापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी इतका वेळ का लागला?
८) २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५८.२२% मतदान आणि २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६५.२% मतदान झाल्याच्या आकडेवारीत ७.८३% वाढ कशी झाली याचा खुलासा का करण्यात आला नाही?
९) एकूण मतांमध्ये ७६ लाख मतांची वाढ कशी झाली?
१०) निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत का पोहचवली नाही?
“वरील सर्व प्रश्न आणि मतदारसंघ निहाय अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. मतदानाची टक्केवारी, मतदान वाढ, मतांची गणना यामध्ये ताळमेळ बसत नसल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण का देण्यात आलेले नाही?”, असा सवाल देखील नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.“लोकशाहीमध्ये लोकांची मते चोरण्याचे काम निवडणूक आयोगाने करता कामा नये आणि लोकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी पुराव्यासह सर्वांसमोर मांडावीत अशी आमची स्पष्ट भूमिका आहे”, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.