नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक फटका बसला असून १०१ जागा लढवूनही काँग्रेसला केवळ १६ ठिकाणी विजय मिळवणे शक्य झाले त्यानंतर काँग्रेसकडून ईव्हीएम मशीनवर खापर फोडण्यात येत आहे.ईव्हीएममध्ये फेरफार आणि सायंकाळी शेवटच्या तासात ७६ लाख मतदान वाढल्यामुळे मविआचा पराभव झाला अशी कारण मीमांसा काँग्रेसकडून केली जात आहे.त्यातच आता काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी एक वादग्रस्त विधान केले असून निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर बसलेला श्वान आहे अशी टीका भाई जगताप यांनी केली होती व या विधानावर चौफेर टीका झाल्यानंतरही ते या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना भाई जगताप म्हणाले,“मी ४५ वर्षांपासून राजकारणात असून महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला तो अनपेक्षित आहे.महायुती सरकारने एवढे मोठे काही काम केले नव्हते.चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.मी आधीपासून सांगत आलो आहे की हा सर्व ईव्हीएमचा खेळ आहे.आज नाही तर उद्या यावर चर्चा व्हायलाच हवी म्हणूनच काँग्रेसने पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचे आवाहन केले आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते.जर या लोकशाहीवर जर संशय घेतला जात असेल तर त्याचे उत्तर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला द्यावेच लागेल.”
निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप पुढे म्हणाले की,निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर बसलेले श्वान आहे.केंद्रीय यंत्रणा लोकशाहीला बळकट करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या मात्र दुर्दैवाने त्याचा दुरुपयोग सुरू आहे.महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात कांड होत आहेत.
भाई जगताप यांचे हे विधान व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत.त्यांनी आयोगाची माफी मागावी असे बोलले जात आहे मात्र आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे भाई जगताप म्हणाले.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना ते म्हणाले,निवडणूक आयोग आभाळातून आलेला नाही.लोकशाहीला बळकट करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली असून कुणाची हुजरेगिरी करण्यासाठी आयोगाची स्थापना झालेली नाही.आयोग हुजरेगिरी करत असल्यामुळेच मी त्यांच्यावर टीका केली.मी माझ्या विधानावर ठाम आहे.टीएन शेषण यांनी ज्याप्रकारे काम केले तसेच काम करण्याची आता गरज आहे असेही भाई जगताप यांनी नमूद केले आहे.