“रात्री ११.३० पर्यंत मतदान व ती ७६ लाख मते कुठून आली?” !! “हे लोक कुठून आले” ? !! “कुठे गेले” ? !! ईव्हीएम घोटाळ्याबाबत संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० नोव्हेंबर २४ शनिवार
राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली असून महायुतीला २८८ पैकी तब्बल २३५ जागा मिळाल्या आहेत मात्र महायुतीने अद्याप सत्तास्थापन केलेली नाही.महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न देखील सुटलेला नाही त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.अशातच महायुतीचा हा विजय म्हणजे मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.सरकारने ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा दावा विरोधक करत आहेत.शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी दावा केला आहे की,“राज्यात मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत ७६ लाख लोकांनी मतदान केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे परंतु ही ७६ लाख मते आली कुठून ? हे लोक कुठून आले ? कुठे गेले ?” याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे असे त्यांनी नमूद केले आहे.संजय राऊत म्हणाले,काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन आपल्या गावी गेले आहेत.नेमके अमावस्येच्या दिवशी ते गावी गेले आहेत.अनेकदा अमावस्येच्या दिवशी ते गावी का जातात ते मला कळत नाही.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की आणखी कोणी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाणून घेण्याची महाराष्ट्र वाट पाहत आहे.मुख्यमंत्रीपदाची घोषणा कधी होणार ? फडणवीसांचे नाव समोर येणार की आणखी कोणाच्या नावाची घोषणा होणार ? असे प्रश्न लोकांना पडले आहेत तसेच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जगभरातून संशय व्यक्त केला जात आहे कारण निकालात दिसलेली ७६ लाख मते वाढली कशी ? ती आली कुठून ? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले,“सामना चित्रपटात एक संवाद आहे.मारुती कांबळेचे पुढे काय झाले ? तसेच या ७६ लाख लाख मतांचे काय झाले ? ती मते आली कुठून ? संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत हे मतदान चालू होते असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे परंतु राज्याच्या कुठल्या भागात रात्री मतदान चालू होते ? अशाच पद्धतीने हरियाणात देखील १४ लाख मते वाढली आहेत.महाराष्ट्रात रात्री ११.३० वाजेपर्यंत ७६ लाख मते वाढली त्यांचा हिशेब काही लागत नाही”.संजय राऊत म्हणाले,“ती ७६ लाख मते महायुती नावाच्या या गोष्टीच्या विजयाची शिल्पकार ठरली आहेत.हे लाडकी बहीण योजना वगैरे यात काही तथ्य नाही.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा प्रश्न विचार करण्यासारखा आहे कि ती ७६ लाख मते आली कुठून ? राज्याच्या कुठल्या भागात रात्री रांगा लावून मतदान चालू होते ? मतदाराची जी शेवटची आकडेवारी समोर आली आहे ती संशयास्पद आहे त्यामुळे ती निवडणूक आयोगाने दाखवावी.ती मते कुठून आली,कुठे झाली,कुठल्या भागात रात्री मतदान चालू होते ? कोण मतदान करत होते ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्यामुळे महायुतीचा हा विजय खरा नाही असे वाटते”.
संजय राऊतांचा शिंदेंना चिमटा
शिवसेना (ठाकरे) खासदार म्हणाले,“एकनाथ शिंदे आता हसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य व तेज मावलळले आहे,ते सतत एकच गोष्ट बडबडतायत,मी लाडका भाऊ,मी लाडका भाऊ…. परंतु ते आता मोदी-शाहांचे लाडके भाऊ राहिले नाहीत त्यांना उपचारांची गरज आहे.दरम्यान ते अमावस्येच्या मुहुर्तावर परत एकदा गावी गेले आहेत तिथे कोणती देवी आहे मला ठावूक नाही”.