निवडणूक आयोगावर विश्वास ठेवून चूक केली

ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप केला जात आहे.याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले,“काही लोकांनी ईव्हीएम कसे सेट केले जाते याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते.आमची कमतरता होती की,आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल असे कधी वाटले नव्हते.आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही पण निकालानंतर आता तथ्य दिसत आहे.” राज्यातील २२ उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे यातून काही साध्य होईल का ? याबाबत मला शंका वाटते असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले,“निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा जावे लागेल.लोक जागृत आहेतच त्यांना उठावासाठी तयार करावे लागेल.बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा परिणाम आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही.”

अन्यथा संसदीय लोकशाही उध्वस्त होईल

“बाबा आढाव यांच्या उपोषणाने एकप्रकारचा दिलासा सामान्य माणसांना मिळत आहे.राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानेच भूमिका घेणे पुरेसे नाही.जनतेचाही यासाठी उठाव व्हायला हवा अन्यथा संसदीय लोकशाही उध्वस्त होईल.देशाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत त्यांना याची काही पडलेली नाही.संसदेत आम्ही मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला बोलू देत नाहीत.रोज सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलायला उभे राहतात पण त्यांना बोलू दिले जात नाही.मागच्या सहा दिवसात संसदेत देशाच्या एकाही प्रश्नाची चर्चा होऊ शकलेली नाही” असेही शरद पवार म्हणाले.