नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यात सत्तांतर घडवून भाजपने काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला.मात्र याच भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने तब्बल ९ जागांवर विजय मिळविला आहे तर भाजपला मात्र खातेही उघडता आलेले नाही.भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत.तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील याच नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात.राज्य पातळीवरील दोन मोठ्या नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या काटोल आणि नरखेड या तालुक्यांतील सभापतीपद राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश मिळवले आहे.तसेच हिंगणा तालुक्यातील सभापतीपद निवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एका तालुक्याचे सभापतीपद मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष यशस्वी ठरला आहे.या पक्षाचे रामटेक तालुक्यातील आमदार आशिष जैसवाल यांनी तालुक्यातील सभापतीपद आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे खेचून आणले आहे.दरम्यान नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ २ तालुक्यांमध्ये उपसभापतीपदावर समाधान मानवे लागले आहे.पक्षातील दिग्गज नेते ज्या नागपूर जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यात सभापतीपद निवडणुकीत भाजपची दारूण अवस्था झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.