अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०२ डिसेंबर २४ सोमवार

नेवासे तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते व आता ग्रामसभेने आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे व जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले आहे.

सौंदाळा येथे झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत व जर शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारला जाईल.शिव्या देतांना आईचा व बहिणीचा कुठलाही दोष नसतांना त्यांच्या शारीरिक अवयव संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देतांना आपल्या आई,बहिणींना व मुलीला आठवले पाहिजे त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे असे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले आहे.यावेळी बालकामगार बंदीचा ठराव घेण्यात आला.बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा अशी घोषणा करून बालकामगार निदर्शनास आल्यास त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा.त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस दिले जाईल असे ठरले.यावेळी ग्रामसेविक प्रतिभा पिसोटे,उपसरपंच कोमल आरगडे,सदस्य मंगल ज्ञानदेव आरगडे,छाया मीनीनाथ आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला हजर होत्या.

बालविवाहास बंदी

सौंदाळा गावामध्ये बालविवाह शंभर टक्के बंदी करण्यात आलेले आहे.गावात कुणीही बालविवाह करू नये.केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ठरले. सोशल मीडिया व मोबाईलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने यापुढे संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल द्यायचा नाही असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.या ठारावाची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली त्यास अनुमोदन गणेश आरगडे यांनी दिले आहे.