नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी आजच्या बैठकाही रद्द केल्याचे समजते.गेल्या तीन चार दिवसांपासून ते आराम करत आहेत. दुसऱ्या बाजूला महायुतीमधील घटक पक्ष असेलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सत्तास्थापनेच्या आधी मंत्रिपदे मिळविण्यासाठी हालचाल सुरू केल्याचे दिसते.सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले.सोमवारी रात्री दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. अजित पवारांकडून गृहनिर्माण खात्याची मागणी झाल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) एका वरिष्ठ नेत्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर द इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना सांगितले की,आम्ही अवाजवी अशा मागण्या करत नाही आहोत.अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाच गृहनिर्माण खाते मागितले होते.आता नवे सरकार स्थापन होत असतांना राष्ट्रवादीने गृहनिर्माण खात्याचा आग्रह धरला असून हे खाते आमच्या यादीतील महत्त्वाचे खाते आहे असेही या नेत्याने सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण खाते भाजपाचे अतुल सावे यांच्याकडे होते तर महाविकास आघाडीचे सरकार असतांना गृहनिर्माण खाते राष्ट्रवादी काँग्रेसचे (संयुक्त) नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होते.२०२३ साली अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर त्यांच्या गटाला नऊ मंत्रिपदे देण्यात आली होती यामध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री,अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी होती.छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा,दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण,धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन,धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी,आदिती तटकरेंकडे महिला आणि बाल कल्याण,अनिल पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन आणि संजय बनसोडे यांच्याकडे युवक,क्रीडा आणि बंदरे विकास अशी खाती देण्यात आली होती.विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री भाजपाचा असेल असे जाहीर केले होते तसेच मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.दरम्यान एकनाथ शिंदेची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर पडते की काय ? अशी चर्चा राजकीय गोटात चर्चिली जात आहे.