भाजप विधिमंडळ पक्षाची नवा नेता निवडीसाठी आज सकाळी विधानभवनात बैठक होत आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल.सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू असतांना दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले होते.सत्तेत शिंदे यांना मनासारखा वाटा मिळणार नसल्यानेच बहुधा शिंदे गटाचे नेते बिथरले असावेत असे बोलले जाते.शिवसेनेचे (शिंदे) नेते भाजपला लक्ष्य करीत असतांना छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर कुरघोडी केली.शपथविधी सोहळ्याची तयारी बघण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली.‘शपथविधी समारंभाचे आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ट्वीटवरून समजले’ असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी विधान करीत शिवसेनेला विश्वासात न घेतल्याबद्दल नापसंती व्यक्त केली.‘भाजप हा मोठा भाऊ आहे.शपथविधीसाठी आम्हाला बोलावले तर जाऊ’ असे वक्तव्य शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले.सामंत आणि केसरकर यांचा एकूणच सूर हा भाजपच्या विरोधी होता.भाजपकडून परस्पर आणि एकतर्फी निर्णय घेतले जात असल्याची भावना या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
शिरसाट यांचे प्रत्युत्तर
● शिंदे यांच्या आजारपणावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी,‘एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी लाचार नाहीत त्यांच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही.सत्तेसाठी सोंग ढोंग करणे त्यांच्यासाठी गरजेचे नाही’ असे प्रतिपादन केले.शिंदे यांच्या राजकीय आजारावरून भाजपच्या गोटातून सुरू झालेल्या कुजबुज मोहिमेला शिरसाट यांनी तेवढेच सडेतोड उत्तर दिले.
● महायुतीत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले असतांना भाजपकडून मवाळ भूमिका स्वीकारण्यात आली होती पण राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले.भुजबळ म्हणाले,विजयी होण्याच्या प्रमाणाचा विचार केल्यास भाजपनंतर आम्हाला यश मिळाले आहे यामुळे सत्तावाटपात आम्हालाही योग्य वाटा हवा आहे.भुजबळ यांनी एक प्रकारे शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचे यश अधिक असल्याचा दावा केला आहे.