मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ डिसेंबर २४ बुधवार
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १० दिवस उलटले तरी अद्याप राज्याला नवे सरकार लाभलेले नाही.राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून महायुतीने राज्यात तब्बल २३५ जागा जिंकल्या आहेत.मात्र महायुती अद्याप सरकार स्थापन करू शकलेली नाही.महायुतीत काही दिवस मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले.पाठोपाठ आता गृहमंत्रीपदावरून गोंधळ चालू आहे.एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्त्व करण्याची इच्छा होती मात्र भाजपाकडून नकार मिळाल्यानंतर शिंदे यांनी स्पष्ट केले की भाजपा पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नेत्याचे नाव जाहीर करतील मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन. मात्र शिंदे आता महायुतीच्या सरकारमध्ये ग़ृहमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.गृहमंत्रीपदामुळेच महायुतीच्या चर्चा लांबल्या असून शपथविधी रखडल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्रीपद,गृहमंत्रीपद व खातेवाटपासंदर्भातील चर्चेसाठी एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.या भेटीत त्यांनी भाजपाकडे किमान सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्रीपद दिले जावे अशी मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीवेळी नव्या सरकारमध्ये सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्रीपद मागितल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.एका वरिष्ठ भाजपा नेत्याच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असून मात्र भाजपाने ही मागणी तिथल्या तिथे फेटाळून लावली असे केल्यास राजकारणात एक चुकीचे उदाहरण जाईल असेही भाजपाने स्पष्ट केले आहे.सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याची व्यवस्था नाही असा निर्णय घेतल्याने देशाच्या राजकारणात एक चुकीचे उदाहरण तयार होईल त्याचबरोबर प्रशासनावर त्याचा विपरित परिणाम होईल असे भाजपाने शिंदे यांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.भाजपा कार्यकर्त्यांनाही हे आवडणार नाही असेही स्पष्ट केले आहे.दरम्यान यावेळी भाजपाने शिंदे यांना विचारले की सध्याच्या घडीला तुम्ही भाजपा अध्यक्षांच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते ? इतक्या मोठ्या संख्येने तुमचे आमदार निवडून आले असते तर तुम्ही मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला असता का ? यावर शिंदे यांच्याकडे उत्तर नव्हते असे भाजपा नेत्याने सांगितले आहे.