मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०४ डिसेंबर २४ बुधवार

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १० दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत असून भाजपा आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अनेक बैठका झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे.गुरूवारी होणाऱ्या (५ डिसेंबर) शपथविधीवेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे कळत असून टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली त्यानंतर हे वृत्त समोर आले आहे.दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शाहांना भेटायला गेल्याच्या सहा दिवसानंतर काल पुन्हा एकदा फडणवीस आणि शिंदे समोरासमोर भेटले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सामील व्हावे यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढली असल्याचे समजते.

शिवसेनेमधील नेत्यांनी सांगितले की,आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक केंद्रातून पाठविलेले निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत होणार आहे व या बैठकीनंतर ते दोघेही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत तसेच त्यांच्या उपस्थितीत सत्तास्थापनेबाबत अंतिम निश्चिती होण्याची शक्यता आहे तसेच आज देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचाही दावा केला जाणार आहे.शिवसेनेमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरूवारी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्यानंतर काही दिवसांनी सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अंतिम ठरल्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल.शिवसेनेच्या एका नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलतांना सांगितले की,खातेवाटपाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.गृह खाते कुणाला मिळणार ? याचीही निश्चिती झालेली नाही.सत्तास्थापनेनंतर कोणते खाते कुणाला मिळणार हे कळेल.