मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०४ डिसेंबर २४ बुधवार

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गेल्या जवळपास १० दिवसांपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत मात्र मुख्यमंत्री कोण होणार ? याचे उत्तर महाराष्ट्राला मिळत नव्हते अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? हे आज स्पष्ट झाले आहे.आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली व या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.फडणवीस व शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) यांनी राजभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.उद्या (५ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात महायुतीच्या नेत्यांचा शपथविधी पार पडेल.

दरम्यान या शपथविधीची निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे.देवेंद्र फडणवीस यांनी ही निमंत्रण पत्रिका शेअर केली असून यावर लिहिले आहे की, देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान,फोर्ट,मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे याप्रसंगी आपण कृपया उपस्थित रहावे ही विनंती.राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ही निमंत्रण पत्रिका जारी केली आहे.

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत की उद्या अजित पवार व एकनाथ शिंदे यांचादेखील शपथविधी होईल.फडणवीसांनी सांगितले की मी स्वतः एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आणि शिंदे यांनी त्यास सहमती दर्शवली आहे तसेच आमची पदे बदलली असली तर ही पदे केवळ तांत्रिक बाबी आहेत.आम्ही तिघेही राज्याची जबाबदारी सांभाळू असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदेंना मंत्रीमंडळात राहण्याची फडणवीसांकडून विनंती

“मी एकनाथ शिंदेंना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रीमंडळात राहावे व त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी मला खात्री आहे त्यामुळे आम्ही तिघे व आमच्या पक्षाचे इतर नेते,मित्रपक्ष असे मिळून चांगले सरकार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न आम्ही करू” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.