मागच्या पाच वर्षांत राज्याने खूप काही राजकारण पाहिले,पुढची पाच वर्ष वेगळे राजकारण पाहायला मिळणार का ? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले,“यावेळी पूर्णपणे वेगळे राजकारण असेल.मी आधीच सांगितले की मला बदल्याचे नाही तर बदल दाखवेल असे राजकारण करायचे आहे.विरोधकांची संख्या कमी आहे हे खरे आहे पण विरोधकांच्या आवाजावर किंवा त्यांच्या संख्येवर आम्ही मूल्यमापन करणार नाही.त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान देऊ.स्थिर सरकारचे पाच वर्ष पाहायला मिळतील.जनतेने प्रचंड असे बहुमत दिले आहे त्यामुळे जनतेला स्थिर सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे.”“२०१९ ते २०२२ च्या मध्यापर्यंत राज्याला जे वेगवेगळे बदल दिसले तसे धक्के यापुढे लागू नयेत ही जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे.राजकारणातून संपवू असे म्हणणाऱ्या नेत्यांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,महाराष्ट्राचे पूर्वी जे राजकीय वातावरण होते ते पुन्हा योग्य कसे करता येईल याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांना करावा लागेल.आज शपथविधीचे आमंत्रण सर्वच माजी मुख्यमंत्र्यांना दिले होते तसेच राज ठाकरे यांनाही शपथविधीचे आमंत्रण मी स्वतः फोन करून दिले होते मात्र त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत.महाराष्ट्रातला राजकीय संवाद कधीही संपलेला नाही.दक्षिणेत ज्याप्रमाणे खून के प्यासे असे राजकारण असते त्याप्रकारचे राजकारण महाराष्ट्रात होत नाही.