“लोकशाही बळकटीकरणाच्या लढ्याला यश” !! अजित पवारांची ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांचे खोचक टीकास्त्र !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ डिसेंबर २४ शनिवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले असून दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. अजित पवारांना न्यायालयाने एकीकडे दिलासा दिला आहे तर दुसरीकडे त्यांच्यावर आणि सरकारवर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अजित पवारांना खोचक टोला लगावला असून सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की,आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची मालमत्ता सहीसलामत दादांना परत केली ! लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे ! लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी,यशवंत जाधव,रवींद्र वायकर,राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता !”
सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक व्हिडीओ देखील जारी केला असून या व्हिडीओत त्यांनी म्हटले आहे की,“कालच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आज लगेचच अजित पवारांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सहीसलामत त्यांना परत केली.खरे म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवारांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेले आहे.हा लोकशाही बळकटीकरणाचा,महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्याआधी सुद्धा लढवला गेला आहे.भावना गवळी,यशवंत जाधव,रवींद्र वायकर,राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिंमतीने हा लढा दिला होता ! या शूरवीरांनी मोठ्या ताकदीने हा पराक्रम बजावला होता.त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा” अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान आयकर विभागाने ६ डिसेंबर २०२१ रोजी बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे व यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला आहे.आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते त्यावेळी आयकर विभागाने काही कागदपत्रे आणि मालमत्ता जप्त केल्या होत्या पण नंतर बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक न्यायाधिकरणाने पुराव्यांअभावी आयकर विभागाचे दावे फेटाळले होते.