Just another WordPress site

“मान्याचीवाडी ठरली देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत” !! राष्ट्रपतींच्या हस्ते दोन पुरस्कारांसह अडीच कोटींच्या बक्षिसांचे वितरण !!

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०७ डिसेंबर २४ शनिवार

वैशिष्ठ्यपूर्ण ग्राम म्हणून सर्वदूर लौकिक असलेल्या मान्याचीवाडी (ता.पाटण) ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्रामऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर झाला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते नवी दिल्लीमध्ये येत्या बुधवारी (दि.११) मान्याचीवाडीला या पुरस्कारांसह तब्बल अडीच कोटी रुपयांचे बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे.राष्ट्रीयस्तरावरील दोन सन्मानामुळे मान्याचीवाडीच्या गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला आहे.

केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या ग्रामस्तरावरील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर आधारित असलेल्या गरिबीमुक्त गाव,आरोग्यदायी गाव,बालस्नेही गाव,जलसमृद्ध गाव,स्वच्छ हरित गाव,पायाभूत सुविधांनी स्वयंपूर्ण गाव,सामाजिक न्याय व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव व महिलास्नेही गाव या बाबींवर विशेष काम करत शाश्वत विकासाची गावे निर्माण करण्यासाठी मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने केलेले विशेष प्रयत्न फलश्रृतीस गेले आणि प्रतिष्ठेच्या दोन पुरस्कारांवर मान्याचीवाडीची मोहर उमटली आहे.या पुरस्कारांसाठी राज्य शासनातर्फे मान्याचीवाडीची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती व त्यानुसार मान्याचीवाडीच्या कार्याची खातरजमा करून या ग्रामपंचायतीला दीड कोटी रुपयांच्या राष्ट्रीयस्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.राज्यातील पहिले सौरग्राम आणि अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचे प्रभावी काम केल्याबद्दल एक कोटी रुपयांचा प्रथम क्रमांकाचा ग्रामऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर झाला.या पुरस्कारांसाठी ‘यशदा’चे उपमहासंचालक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी,सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन,गटविकास अधिकारी सविता पवार,राज्य समन्वयक अनिल बगाटे,श्रीधर कुलकर्णी,अमीर शेख,संतोष सकपाळ,बाळासाहेब बोराटे,जोती पाटील,मधुकर मोरे आदींचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने म्हणाले,गावकऱ्यांच्या कष्ट,एकीचे हे फळ असून गावाने २४ वर्षांपासून लोकसहभागातून उभ्या केलेल्या चळवळीत कधी यश तर कधी अपयश आले पण आम्ही खचलो नाही.ग्रामविकासाची मशाल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तेवत ठेवली आणि चारशे लोकसंख्येच्या छोट्याशा गावाने देशपातळीवरील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचे एकाचवेळी दोन बहुमान पटकावले आहे हि संपूर्ण ग्रामस्थांकरिता मोठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.