सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ डिसेंबर २४ शनिवार
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडी गावात मतदानाच्या आकडेवारीत घोळ असल्याचे सांगून तिथे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता.मात्र निवडणूक आयोगाने यासाठी परवानगी दिली नाही तसेच पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत गावकऱ्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.यानंतर मारकडवाडी गाव हे देशभरात चर्चेत आले त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मारकडवाडीतून बॅलेट यात्रा सुरू करणार असल्याचीही चर्चा समोर आली.आता माळशिरसचे नवनियुक्त आमदार उत्तमराव जानकर यांनी आपली आमदारकी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.आजपासून ९ डिसेंबरपर्यंत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे व यासाठी सर्व आमदार मुंबईत आले असून २८८ आमदारांचे शपथविधी पार पडणार आहेत.आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले,“ईव्हीएमच्या विरोधासाठी शरद पवार उद्या (८ डिसेंबर) मारकडवाडी येथे येणार आहेत.माझ्याविरोधात पराभूत झालेले भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि मी मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आग्रही आहोत त्यासाठी मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे.निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याची परवानगी दिल्यास मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहे.”
मी बलिदान देण्यास तयार-उत्तमराव जानकर
“पुढील १५ दिवसांत मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन राज्यात आणि देशात जे संशयाचे धुके निर्माण झाले आहे ते बाजूला करावे असा आमचा प्रयत्न आहे.निवडणूक आयोगाला आम्ही पत्र देत आहोत त्यांनी यासाठी होकार दिल्यानंतर मी राजीनामा देणार आहे.ईव्हीएमच्या विरोधात कुणीतरी बलिदान दिले पाहीजे व त्यासाठी मी तयार आहे” असेही उत्तमराव जानकर यावेळी म्हणाले.
ईव्हीएमच्या माध्यमातून जे सत्तेवर आले आहेत व त्यांना केवळ २५.१ टक्का मतदान मिळालेले आहे.ज्यांना उर्वरित मतदान मिळाले ते पराभूत झाले आहेत.यशोमती ठाकूर,बच्चू कडू हे सभागृहाच्या बाहेर कसे राहू शकतात ? माझ्या मतदारसंघात जवळपास लाखभर मते वळविण्यात आली आहेत असाही आरोप उत्तमराव जानकर यांनी केला.माझा विजय झाला असला तरी माझ्या मतदारसंघातील जनतेमध्ये भयानक आक्रोश आहे.एका गावात मतपत्रिकेवर मतदानही सुरू झाले होते पण सुरक्षा दलाने बळजबरी करून तो प्रयत्न हाणून पाडला.लोकशाहीत लोकांना त्यांचा प्रयोग करू द्यायला हवा होता पण तसे झाले नाही त्यामुळे मी आणि राम सातपुते मतपत्रिकेवर मतदान घेण्यास तयार आहोत असेही उत्तमराव जानकर म्हणाले.
दरम्यान विक्रोळी विधानसभेचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनीही अशाच प्रकारची घोषणा केली असून आमदारकीचा राजीनामा देऊन मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास मी तयार आहे अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली आहे.“माझ्या मतदारसंघात किमान ४० ते ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होणे अपेक्षित असतांना केवळ १६ हजारांच्या मताधिक्याने माझा विजय झाला आहे,हा निकाल विक्रोळीतील जनतेलाही मान्य नाही त्यामुळे राजीनामा देऊन मतपत्रिकेवर मतदान घेण्यास मी तयार आहे” अशी भूमिका सुनील राऊत यांनी मांडली आहे.