सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ डिसेंबर २४ रविवार
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तसेच त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत.आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार मारकडवाडीत पोहोचले असून त्यांनी तिथून लाँग मार्चला सुरुवात केली.मारकडवाडीत शरद पवारांनी ग्रामस्थांना संबोधन केले तसेच शरद पवारांसमोरच उपस्थित महिलांनी शासनाविरोधात एल्गार पुकारला असून काही महिलांनी उत्स्फूर्त भाषणे करून शासनाला कोंडीत पकडले आहे.
एक महिला म्हणाली,“आमचे मतदान व्हायचे होते ते झाले नाही.आमच्यावर शासनाने अन्याय केला.बॅलेट पेपरवर मतदानही करू दिले नाही त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला.पोलिसांनी दमदाटी करून गुन्हा दाखल करू असे पोलीस म्हणत होते.आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.”
दुसऱ्या महिलेने कवितेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा गजर करत ईव्हीएमविरोधात न्याय मागितला.“लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्येचा अपमान करत आहात.तुम्ही स्वःच्या हिमतीवर अनेकांना जगवले होते” असे म्हणत सदर महिला पुढे म्हणाली, “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीच्या देशभर पेटला पाहिजे.”
फक्त महिलाच नव्हे तर शाळकरी मुलीनेही ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला असून ते म्हणाले,“आमच्या आमदारसाहेबांना जास्त लीड मिळायचे पण यंदा मिळाले नाही त्यामुळे या शकंचे निरसन व्हावे म्हणून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी केली.पण आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करू दिले नाही.हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे,ईव्हीएम हटवा आणि देश वाचवा” असे अक्खे मारकडवाडीतील लहान थोर महिला पुरुष विद्यार्थी म्हणत आहे.दरम्यान महाराष्ट्रातील जनतेसह तमाम भारतीयांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारण्याची वेळ आली असल्याची मनीषा मारकडवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केली जात आहे.