नंदुरबार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०९ डिसेंबर २४ सोमवार
राज्यातील अनेक गावांमध्ये दारु बंदीसाठी लढा सुरु असून दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात व त्यामुळेच अनेक भागांमध्ये दारु बंदीसाठी महिलांचा एल्गार पाहायला मिळतो.नंदुरबारमधील असलोद गावामध्ये दारुबंदीसाठी चक्क मतदान घेण्यात आले.ज्यामध्ये दारुबंदीच्या समर्थनार्थ सर्वाधिक मतदान झाले आहे व या मतदानाची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.नंदुरबार शहादा तालुक्यातील असलोद येथे दारु बंदीसाठी मतदान घेण्यात आले.उभी आडवी विरुद्ध आडवी बाटली अशी नावे असलेल्या मतपत्रिकेवर गावातील महिलांचे मतदान घेण्यात आले.सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झालेल्या या प्रक्रियेमध्ये गावातील १२६० महिलांनी मतदान केले. सकाळी आठ वाजल्यापासून महिलांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात होते.
दारूबंदीच्या विरोधात सकाळपासूनच महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.मतदान केंद्रांवर महिला मतदारांच्या रांगा पाहण्यास मिळाल्या.६७७ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली व या मतमोजणी प्रक्रियेत आडव्या बाटलीला ६१२ मते मिळाल्याने गावात आता दारूबंदीचा मार्ग मोकळा झाला आहे.गावात दारूबंदी होणार असल्याने गावातील नागरिकांनी एकच जल्लोष केला.गावातील दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांसोबत तरुणांनी ही परिश्रम घेतले होते अखेर त्यांच्या संघर्षाला यश मिळाल्याने निकालानंतर अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहण्यास मिळाले. निकालानंतर महिलांनी सांगितले की आमच्या एकजुटीमुळे व्यसनाने गावातील उध्वस्त होणारे संसार वाचणार असल्याचा आनंद आहे.आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते व या ऐतिहासिक निकालानंतर गावात जल्लोष केला जात आहे.