मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालेले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.खरेतर राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महत्वाचे मानली जाते मात्र आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळणार की नाही ? याबाबतही महिलांमध्ये संभ्रम आहे.दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ? यासंदर्भातील महत्वाची माहिती समोर आली असून भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली असून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार ?
विधानसभा निवडणूक निकालांना ‘कलाटणी’ देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेलाच सरकार कलाटणी देणार असल्याची सध्या चर्चा आहे.अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे.छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील अशी चर्चा आहे.मात्र खरेच अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.आदिती तटकरे म्हणाल्या,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असतांना आम्ही ती योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केला.२ कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाही त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात.मी आता त्या विभागाची मंत्री नाही तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही. छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते.कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील.मी मंत्री असतांना अशा तक्रारी आल्या नव्हत्या. आत्ता आल्यात की नाही ते मला माहिती नाही.कोणीही अशा पद्धतीने तक्रार केली असेल तर विभागाचे आधिकारी निर्णय घेतात.आता तक्रारी आल्यात की नाही यासंदर्भातील मला माहिती नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.