अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार; ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला भाजपाची साथ
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन हि निवडणूक लढवू नये असे आवाहन केले होते तसेच राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही पोटनिडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती.अखेर राज ठाकरे यांच्या आवाहनाला साथ देत भाजपने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली.या बैठकीनंतर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची अंतर्गत बैठक झाली.यांनतर ही पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे भाजपने जाहीर केले आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
याठिकाणी ऋतुजा लटके निवडून याव्यात यासाठी त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आमचा अर्ज मागे घेत आहोत असे चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आहे.आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही अंधेरीची निवडणूक १०० टक्के जिंकणार होतो.पण जेव्हा कधी एखाद्या आमदाराचे निधन होते आणि त्याजागी त्यांच्या पत्नी किंवा मुलगा उभा राहतो तेव्हा उमेदवार द्यायचा नाही ही आपली संस्कृती आहे असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती.यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही एकनाथ शिंदे यांना पत्र लिहुन सदरील निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती.अखेर भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.राज ठाकरे यांनी दिलेले आश्वासन भाजपाने साथ देऊन लीलया पार केले हा संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.त्याचबरोबर भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यभरात कौतुक होत आहे.