मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही व त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून या पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असल्याचे चित्र समोर आले आहे.मविआमधील तीन पक्षांना मिळून एकूण २८८ पैकी केवळ ४६ जागा मिळाल्या आहेत.विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे १० टक्क्यांचे संख्याबळ (२९ आमदार) एकाही पक्षाकडे नाही.शिवसेना (ठाकरे) पक्षाला २०,काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला केवळ १० जागा जिंकता आल्या आहेत.विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी २८८ पैकी १० टक्के म्हणजेच किमान २९ जागा असण्याची आवश्यकता आहे मात्र पुरेसे संख्याबळ नसतांनाही विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल अशी चर्चा असतांना आता तीनही पक्षांची हे पद मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.दरम्यान विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.राहुल नार्वेकर म्हणाले,विरोधी पक्षांमधील आमदारांची संख्या कमी दिसून येत असली तरी देखील त्यांच्यावर अन्याय होणार नाही.सत्तारुढ बाकावर २३७ आमदार आहेत तर विरोधी बाकावर ५० सदस्य असून त्यांची संख्या कमी असली तरी मी त्यांना वारंवार बोलण्याची संधी देईन.त्यांचे विचार,त्यांची मते प्रकट करण्याची संधी दिली जाईल.मी आधीच याची ग्वाही दिली आहे.विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत १२ सदस्य असतात.प्रत्येक पक्षाच्या २० सदस्यांपाठी एक असे १२,१३ प्रतिनिधी या समितीत असतात.विरोधकांची संख्या बसत नसतांनाही आम्ही त्यांचा या समितीत समावेश केला आहे कारण मला वाटते की सभागृहाचे कामकाज योग्यरित्या चालवण्यासाठी सत्तारूढ पक्ष व विरोधकांमध्ये सहकार्य असणे आवश्यक आहे.
विधानसभा अध्यक्ष म्हणाले,“माझे ध्येय आहे की येत्या काळात महाराष्ट्र विधानसभेच्या बैठका या अत्यंत नियमाने व योग्यरित्या चालाव्या.विधानसभेचा एकही मिनिट वाया जाता कामा नये.लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचा प्रत्येक मिनिट सकारात्मक चर्चेसाठी वापरला जायला हवा व त्यासाठीच मी विरोधक व सत्तारूढ पक्षांना बरोबर घेऊन काम करू इच्छितो.मागील अडीच वर्षांमध्ये मला दोन्ही बाजूचे सहकार्य मिळाले व त्यामुळेच मी उत्तम पद्धतीने अडीच वर्षे विधानसभेचे कामकाज करू शकलो”.
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का?
दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी राहुल नार्वेकरांना प्रश्न विचारला की विधानसभेला विरोधी पक्षानेता मिळणार का ? यावर नार्वेकर म्हणाले,“याबाबत विधानसभा निर्णय घेत असते.नियमानुसार महाराष्ट्र विधानसभा नियमात ज्या तरतुदी असतील तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथा-परंपरेच्या अनुषंगाने मी योग्य तो निर्णय घेईन”.