मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० डिसेंबर २४ मंगळवार
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या आठवड्यात संपन्न झाला व त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरु होत आहे व त्याच्याआधी कॅबिनेटचा विस्तार होण्याची शक्यता आहे.१४ डिसेंबरला याबद्दलची घोषणा अपेक्षित आहे. फडणवीस सरकारमध्ये स्वच्छ,निष्कलंक चेहरे असावेत यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्त्व आग्रही आहे.गेल्या मंत्रिमंडळात असणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना यंदा संधी मिळण्याची शक्यता आहे.मागील मंत्रिमंडळात असतांना केलेली असमाधानकारक कामगिरी यामागचे कारण ठरु शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
खराब कामगिरी आणि प्रतिमा यामुळे मागील मंत्रिमंडळातील पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.शिवसेनेतील तीन मंत्र्यांचा यामध्ये समावेश असून यात अन्न आणि औषध प्रशासन,जलसंपदा मंत्री संजय राठोड,अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार,आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता असून यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे तसेच भाजपच्याही दोघांना डच्चू मिळण्याची शक्यात असून यात कामगार मंत्री सुरेश खाडे,आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना नारळ दिला जाऊ शकतो.
कोणाकोणाला संधी मिळण्याची शक्यता ?
शिवसेनेकडून उदय सामंत,शंभुराज देसाई,दादा भुसे,गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्री होण्याची संधी आहे व त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पुन्हा पडू शकते तर संजय शिरसाट,प्रताप सरनाईक,भरत गोगावले,आशिष जैस्वाल,राजेश क्षीरसागर,अर्जुन खोतकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे,धर्मरावबाबा आत्राम,अदिती तटकरे,संजय बनसोड,नरहरी झिरवळ,दत्ता भरणे,अनिल पाटील,मकरंद आबा पाटील यांची मंत्रिपदे निश्चित मानली जात आहेत.तर भाजपकडून १५ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात त्यात चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन,सुधीर मुनगंटीवार,चंद्रशेखर बावनकुळे,रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा,राधाकृष्ण विखे पाटील,शिवेंद्रराजे भोसले,अतुल सावे,पंकजा मुंडे,माधुरी मिसाळ,देवयानी फरांदे,संजय कुटे,आशिष शेलार,गणेश नाईक यांचा समावेश असू शकतो.