कांद्याच्या भावाचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत !!

कांद्याच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत असून वेळोवेळी कांद्याच्या किमान निर्यात दरातील वाढीचा किंवा निर्यातबंदीचा जिल्ह्यातील कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे.आपल्या येवला मतदारसंघातील लासलगावमध्ये आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून येथून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते.सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपले असून लाल कांद्याची बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.आधीच बिगरमोसमी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे त्रस्त असतांना आता उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.लाल कांदा टिकाऊ नसल्याने तात्काळ विक्री करावी लागते हेही नुकसानीचे महत्वाचे कारण आहे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

                       कांद्यावरील २० टक्के उत्पादन शुल्क माफ केलंं जावं-छगन भुजबळ

सदरहू शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणे गरजेचे असून राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे व त्यासाठी २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे तसेच श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहे त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने माफ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आपण केली आहे.आपल्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळून लवकरच आपल्या बळीराजाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे असेही छगन भुजबळ यांनी या पत्रात म्हटले आहे.छगन भुजबळ यांच्या पत्राला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही उत्तर दिले जाते का ? हे पाहणेही महत्त्वाचे असणार आहे.