“कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे” !! ठाकरे गटाची मागणी
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० डिसेंबर २४ शुक्रवार
कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये काल गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.एकीकडे मनसेने मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला असतांना दुसरीकडे आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.अजमेरा सोसायटीत अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने अभिजीत देशमुख यांना बेदम मारहाण केली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलतांना यासंदर्भात भाष्य केले असून कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतही हे असे प्रकार घडले आहेत.मी वारंवार बोलतोय कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले.मराठी माणसे घाणेरडे आहेत असे म्हटले.शिव्या घातल्या.मुंबईतही मराठी बोलायचे नाही वगैरे म्हणत मराठी माणसाला जागा नाकाल्या जात आहेत असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली.भाजपाने मराठी माणसाची संघटना फोडून मराठी माणूस कमजोर केला.इथे मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी,मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठी हे केले.मुबई अदाणी,लोढा,गुंदेचा व्यापाऱ्यांच्या घश्यात घालावी यासाठी मोदी-शाहा व त्यांच्या व्यापारी गोतावळ्याने मराठी माणसाला कमकुवत केले आहे.निवडणूक निकालांनंतर मराठी माणसावर हल्ले वाढू लागले आहेत.मराठी माणसाला मुंबईतून घालवण्याचे उद्योग चालू आहेत असा दावा राऊतांनी केला.दरम्यान यावेळी संजय राऊतांनी कल्याणमधील प्रकारावरून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.“स्वत:ला जे शिवसेना समजतायत,मोदी-शाहांनी ज्यांच्या हातात शिवसेना चिन्ह दिले त्या नामर्द लोकांना कालची कल्याणमधील घटना टोचते आहे का ? आम्ही बघू काय करायचे ते.मराठी माणसाबाबत ज्यांना वेदना आहे त्यांनी एकत्र यायला पाहिजे.एकनाथ शिंदे नामर्द आहेत.सत्तेसाठी लाचार आहेत.काल मराठी माणसावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी.आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना ? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोन उपमुख्यमंत्री आहेत.तुम्ही स्वत:ला कसले मराठी समजता ?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
“…म्हणून मराठी माणसांची संघटना फोडली” !! मोदी-शाहांसह संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप !!
कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतियांनी काल हल्ले केले.मराठी माणसे घाणेरडी आहेत,मराठी माणसाला जगण्याचा अधिकार नाही,मराठी माणसाला घाणेरड्या शिव्या घातल्या,मुंबईत देखील मराठी मराठी बोलायची नाही,मराठी माणसाला जागा नाकारल्या जात आहेत.या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी जी शिवसेना निर्माण केली भारतीय जनता पक्षाने,नरेंद्र मोदी,अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसांची संघटना फोडून मराठी माणूस कमजोर केली तो यासाठीच की येथे मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी,मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी असा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.