Just another WordPress site

सलग तीन मुली झाल्या व मुलगा होईना म्हणून पत्नीला जिवंत जाळले !!

परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार

परभणी शहरातील गंगाखेड कॉर्नर परिसरात ‘तीनही मुली झाल्या व मुलगा होत नाही’ म्हणून पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीचे नाव कुंडलिक काळे (३२ वर्षे) असे आहे.आरोपीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.या घटनेतील पीडिता मैनाबाई काळे (३० वर्षे) यांचा यात मृत्यू झाला.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.या घटनेमुळे मृत महिलेच्या तीन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरवले आहे.या मुलींचे वय ६ वर्षे,४ वर्षे आणि १ वर्ष असे आहे.या प्रकरणी मृत महिलेची मोठी बहीण भाग्यश्री काळे यांच्या तक्रारीवरून आरोपी कुंडलिक काळे विरोधात पत्नीचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.आरोपी कुंडलिक काळेला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांनी दिली आहे.

मृत महिलेची बहीण भाग्यश्री काळे यांनी सांगितले की,माझी लहान बहीण मैनाबाई काळे तिचा पती कुंडलिक उत्तम काळे त्यांच्या तीन मुलींबरोबर माझ्या शेजारीच राहत होते.मात्र मैनाला तीनही मुली झाल्याने तिचा नवरा कुंडलिक काळे तिला दररोज शिविगाळ आणि मारहाण करायचा.मी अनेकदा त्यांचे भांडण सोडवले आहे.”तो अगदी लहान मुलांनाही मारहाण करायचा.या मुलांच्या शरीरावरही मारल्याने जखमा झाल्याच्या खुना आहेत.माझी बहीण मुलींना घेऊन माझ्याकडे यायची आणि तो मला मारून टाकेल,माझ्या मुलींना सांभाळ असे म्हणायची.त्याने खरेच माझ्या बहिणीला मारून टाकले” असा आरोप तक्रारदार भाग्यश्री काळे यांनी केला आहे.”मी बहिणीचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती वाचली नाही.तिने रुग्णालयात मृत्यू होण्याआधी तिच्यासोबत काय घडले हे सांगितले” असेही तक्रारदार महिलेने नमूद केले आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे म्हणाले,”आरोपी कुंडलिक काळेविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनला बीएनएसच्या कलम १०३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी तीनही मुली झाल्या म्हणून पत्नीला कायम त्रास देत होता.”

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे
फोटो कॅप्शन,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे

याच मानसिकतेतून त्या दिवशी आरोपीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले.ही घटना तक्रारदार महिलेने स्वतः बघितली आहे.त्यांची बहीण कपड्याला आग लागलेल्या अवस्थेत रस्त्यावर आली तेव्हा आरोपी कुंडलिक काळे तेथून पळून जात असल्याचे त्यांनी पाहिले असेही पोलीस निरीक्षक ननवरे यांनी नमूद केले आहे.तक्रारदार बहिणीने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला मावशीला भेटायला दवाखान्यात गेली होती तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला फोन करून घरी यायला सांगितले.त्याने घरी आधीच पेट्रोलचा डबा आणून ठेवत मारण्याचा कट केलेला होता.बहीण घरी आल्यावर त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली आणि तिच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली.त्यानंतर बहिणीने लहान मुलांना बाजूला फेकले आणि ती घराबाहेर रस्त्यावर पळाली तसेच मला वाचवा अशी विनंती करत राहिली.तिन्ही लेकर थोडक्यात वाचली आहेत.मी तक्रार दाखल केली आहे.त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे.पुन्हा कोणत्याच महिलेवर असा अत्याचार अन्याय होऊ नये अशी मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.