पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे विभागात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली पाहायला मिळत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून तब्बल १ कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे.या कारवाई एकूण १६६८ बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,गोवा राज्यातून बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती.नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली व या नाकाबंदीत सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.या कारवाईत एकूण १६६८ बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.दरम्यान सदर प्रकरणी एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये एमडी ड्रग्ज जप्त
तर नागपूर गुन्हे शाखेने ५० लाखांपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे.याप्रकरणी सुमित चिंतलवारसह चार आरोपींना अटक करण्यात आली.नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या एनडीपीएस पथकाने ही कारवाई केली आहे.आरोपींकडून ५५० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून नव वर्षाच्या पार्ट्यांवर नागपूर पोलिसांची बारीक नजर असणार आहे.
तळीरामांवर आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज
दरम्यान नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत.पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी केली जाणार आहे.बेशिस्त चालक,मद्यपींची धरपकड होणार आहे.शहरातील प्रमुख चौक,रिकामे भूखंड आणि मैदानालगत संशयास्पद ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गस्त वाढवली आहे.नाशिकमध्ये चार उपायुक्त,सात सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.१३ पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त, तीन गुन्हे शाखा,चार गुन्हे शोध पथक देखील तैनात करण्यात आले आहेत.नाशिक शहरात ५०० पेक्षा अधिक होमगार्ड दंगल नियंत्रण पथक जलद प्रतिसाद पथकही सज्ज असणार आहे.शहरा बाहेरून येणाऱ्या मार्गांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे.नियमांचे उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्या नाशिककरांवर शहर पोलीस कारवाई करणार आहेत.