मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ जानेवारी २५ मंगळवार
लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव इंडिया आघाडीने केला.भाजपा हा आमचा सर्वांचा राजकीय शत्रू आहे.आम्ही एक होतो त्यामुळे लोकसभेला आम्ही चांगल्या जागा मिळवल्या.दिल्लीत दुर्दैवाने हे चित्र दिसत नाही.दिल्लीची सत्ता ले.गव्हर्नर आणि अमित शाह यांच्या तसेच मोदींच्या हाती आहे.भाजपाचा पराभव करण्यासाठी आपसातले मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे होते असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.मला आश्चर्य वाटते आहे लोकसभेला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढले होते.आमच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आले होते.दिल्लीत काँग्रेस पक्षाने केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या गोष्टीला शिवसेनेचे समर्थन नाही.आम्ही एकत्र आहोत,एकत्र राहिले पाहिजे.टीका वगैरे होऊ शकते,राजकीय विरोध होऊ शकतो पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देशद्रोही ठरवणे योग्य नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे.यानंतर त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण,धनंजय मुंडे यांच्याबाबतही भाष्य केले असून “आम्हाला पुराव्यांशिवाय तुरुंगात टाकले होते त्यावेळी अजित पवार काही बोलले नाहीत.नवाब मलिक,अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावा नाही वगैरे काहीही अजित पवार बोलले नाही.आम्हाला गाडायचे आणि आता धनंजय मुंडेंच्या प्रकरणात पुरावा शोधायचा,बीडमध्ये खेळ चालला आहे लोकांना फसवण्याचा.ज्या पद्धतीने आरोपी,पोलीस आणि राजकारणी यांचे फोटो समोर येत आहेत.बीडच्या संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स चालला आहे.देवेंद्र फडणवीस यांना माझे आवाहन आहे की बीडचे पोलीस खाते बरखास्त करा आणि संतोष देशमुख प्रकरण बीडच्या बाहेर चालवा.एसआयटीमधल्या प्रत्येक अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो आरोपीशी संबंधित आहे की नाही ?” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन एव्हिडन्स अॅक्ट बदलला का ? हे त्यांनी सांगावे.अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत.ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळाल्या आहेत.अजित पवार जर नेते असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलायला हवे होते असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.संतोष देशमुख प्रकरणाचा तपास ही धूळफेक आहे,आत्तापर्यंत वाचवण्याचेच प्रकार सुरु आहेत.सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात.सुरेश धस यांनी महाराष्ट्राला बीड पॅटर्न नावाचा कलंक लागतो आहे तो पुसण्यासाठी सामान्य माणूस म्हणून उभे राहिले पाहिजे आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.