तुळजापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ जानेवारी २५ मंगळवार
सात दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात सिंहासनावर देवीच्या मूर्तीची गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली.आई राजा उदोऽऽ उदोऽऽ च्या जयघोषात महंत,पुजारी आणि मानकर्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.त्यानंतर देवीची नित्योपचार पूजा व धार्मिक कार्यक्रम पार पडले.आज मंगळवारपासून देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून नवरात्र काळात नित्योपचार पूजा,अलंकार महापूजा आणि रात्री छबिना पार पडणार आहे.मंगळवारपासून १४ जानेवारीपर्यंत देवीचा शाकंभरी नवरात्रोत्सव आहे.दररोज नित्यनेमाने धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत.दरम्यान मंगळवारी पहाटे ३ वाजता कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची निद्रा संपून सिंहासनावर चल मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.त्यापूर्वी देवीचे सिंहासन आणि संपूर्ण मुख्य गाभारा गोमुख तिर्थाने धुवून घेण्यात आला.तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव हा धाकटा दसरा म्हणून प्रसिद्ध आहे.विशेषतः कर्नाटक,आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येने देवीदर्शनासाठी शाकंभरी नवरात्र महोत्सव कालावधीत तुळजापुरात येतात.शारदीय नवरात्र महोत्सवाप्रमाणेच शाकंभरी नवरात्र महोत्सव काळातही तुळजापुरातील पुजारी बांधवांच्या घराघरात स्वच्छता केली जाते त्याचबरोबर शाकंभरी नवरात्र महोत्सव काळात उपवास केला जातो.
यावर्षी शाकंभरी नवरात्र महोत्सवात बुधवार ८ जानेवारी रोजी देवीची नित्योपचार पूजा व त्यानंतर रथालंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.गुरुवार ९ जानेवारी रोजी देवीची नित्योपचार पूजा आणि त्यानंतर मुरली अलंकार महापूजा,शुक्रवार १० जानेवारी रोजी शेषशाही अलंकार महापूजा तर शनिवार ११ जानेवारी रोजी सकाळी जलयात्रा काढण्यात येणार आहे.या दिवशी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.रविवार १२ जानेवारी रोजी अग्निस्थापना,शतचंडी यज्ञ आणि देवीची महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.सोमवार १३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता घटोत्थापन आणि रात्री छबिना मिरवणूक व जोगवा कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवातील मुख्य कार्यक्रमाची सांगता होईल.१४ जानेवारी रोजी दुपारी देवीची नित्योपचार पूजा,दुपारी अन्नदान,महाप्रसाद,रात्री छबिना मिरवणूक, संक्रांत पंचांग वाचन होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.